उमरगा : गणेशोत्सवाची धूम जिल्ह्यात सर्वत्र सुरू आहे़ गणेश मुर्ती तयार करण्याचे काम अंतीम टप्प्यात आले असून, उमरगा शहरातील मुर्तीकारांच्या गणेश मुर्तींना कर्नाटकाच्या बाजारपेठेत मोठी मागणी आहे़ अबालवृध्दांचे लाडके दैवत असलेल्या गणरायाचे चार दिवसात आगमन होत आहे़ गणरायाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी तयारी सुरू असून, मुर्तीकारांचे रंगकामही अंतीम टप्प्यात आले आहे़ शहर व परिसरात गणेशमुर्ती तयार करणारे जवळपास २५ कारागिर आहेत़ प्रतिवर्षाच्या तुलनेत यंदाही श्रींच्या विविध प्रकारच्या मुर्त्यांना गणेश मंडळांकडून मागणी वाढली आहे़ जानेवारी महिन्यापासूनच शहरात श्रींची मुर्ती तयार करण्याचे काम सुरू झाले आहे़ जुलै अखेर पर्यंत जवळपास ५० ते २०० रूपयांपर्यंतच्या गणेश मुर्तींना रंग देवून ठेवण्यात आला आहे़ तर जुलै पासून मोठ्या मुर्त्या तयार करण्याचे काम सुरू होते़ पंचमुखी, आडवाकोच, कृष्णरूप, हनुमान, त्रिमुर्ती हनुमान, साईबाबा, नाबाडा, लालबागचा राजा, दगडू शेठ, पार्वती गणेश, रिध्दीसिध्दी, मुलांना शाळेत घेवून जाणारी पार्वती, छत्रपती शिवाजी महाराज आदी विविध प्रकारच्या मुर्त्या तयार असून, विविध कलाकुसरीचे काम झाले आहे़ नाक, डोळे, दागिने आदी रंगकामाची कलाकुसर अंतीम टप्प्यात आली आहे़ दीड हजार रूपयांपासून २१ हजार रूपये किंमतीच्या गणेश मुर्ती मागणीप्रमाणे तयार करण्यात आल्या आहेत़ बाजारपेठेत मुर्त्या दाखलशहरातील पतंगे रोड, शिवाजी चौक, इंदिरा चौक या प्रमुख बाजारपेठेत गणेश मुर्त्यांची मोठी दुकाने उभारण्यात आली आहेत़ शहर व परिसरातील सार्वजनिक मंडळांसह अनेक नागरिकांनी घरात गणेशाची प्रतिष्ठापना करण्यासाठी मुर्त्यांची खरेदी सुरू केली आहे़ गणेश मंडळांनीही स्टेज, मंडपासह इतर आवश्यक त्या बाबींचे काम सुरू केले आहे़ (वार्ताहर)संजय कोराळे या जुन्या व्यवसायिकाच्या कलाकुसरीतून साकारलेल्या गणेशांच्या मुर्त्यांना जिल्ह्याच्या, राज्याच्याच नव्हे तर कर्नाटकाच्या बाजारपेठेतूनही मोठी मागणी आहे़ बिदर, हुमनाबाद, भालकी, बसवकल्याण, गुलबर्गा, संगारेड्डी, आळंद आदी ठिकाणी कोराळे यांनी तयार केलेल्या मुर्त्यांची विक्री होते़ त्यासोबतच विजय पाटील, महेश पाटील या कलावंतांच्या मुर्त्यांनाही मोठी मागणी असल्याचे कोराळे यांनी सांगितले़गणेश मुर्तींचे काम करण्यासाठी कलाकारांची उपलब्धता होत नाही़ त्यामुळे गत १५ वर्षापासून गणेशमूर्ती निर्मितीच्या व्यवसायातील संजय कोराळे या मूर्तीकाराने आपल्या पत्नी छाया कोराळे यांना प्रशिक्षण दिले़ चित्रकला, रांगोळी, भरतकाम या कलेची आवड असल्याने त्यांनीही हे शिकून पतीच्या व्यवसायाला मोठा हातभार लावला आहे़ पुरूषांच्या बरोबरीने गणेश मूर्ती बनविण्यासाठी त्या इतर महिलांना सोबत घेवून काम करीत आहेत़
उमरग्याच्या गणेशमूर्ती कर्नाटकाच्या बाजारपेठेत
By admin | Updated: August 25, 2014 01:37 IST