औरंगाबाद : वरूड ब्रु. (ता. जाफराबाद) चे सरपंच प्रकाश गव्हाड यांना मांत्रिकाने दिलेल्या कानमंत्रामुळे गावात जातीय तेढ निर्माण झाली आहे. पोलिसांनी धनदांडग्यांची बाजू उचलून धरत आततायी भूमिका घेतल्यामुळे गावात भयावह परिस्थिती निर्माण झाली असून, दलितांनी तीन दिवसांपासून गाव सोडले आहे, अशी व्यथा त्या गावच्या दलित तरुणांनी येथे पत्रकार परिषदेत मांडली. गावचे डॉ. राजू साळवे, दीपक साळवे म्हणाले, गावातील बौद्धवाड्याजवळील रस्त्यावर ३० वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र लावलेले आहे. सन २०१२ मध्ये या तैलचित्राला लागूनच मागील बाजूस सरपंच गव्हाड यांनी चार मजली टोलेजंग इमारत उभी केली. या वास्तुसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र अपशकुनी असून, ते काढल्याशिवाय तुला चेन मिळणार नाही, असे एका मांत्रिकाने गव्हाडला सांगितले.साळवे म्हणाले, तैलचित्र काढण्यासाठी त्याने अनेकदा पोस्टरला गाडीने धडका दिल्या. याप्रकरणी त्याने पोलिसांना हाताशी धरले. प्रकरण झाल्यानंतर पोलीस येऊन समाजाची समजूत काढत होते. मिटवून घ्या, असे सांगत होते; परंतु १४ एप्रिल २०१४ रोजी त्याने त्याच्या गुंडांकडून प्रार्थना सुरू असतानाच हल्ला चढविला. आम्ही अॅट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी केली परंतु पोलिसांनी गुन्हा नोंदवून घ्यायला एक महिना उशीर केला. त्यानंतर गव्हाडची खोटी तक्रार घेऊन ३० दलितांविरुद्ध दरोड्याचे गुन्हे दाखल केले. ते दलित कुटुंब तेव्हापासून गावातून फरार आहेत; परंतु गव्हाडविरुद्ध अॅट्रॉसिटी असताना तो पोलिसांसोबत फिरत आहे. त्याला अटक केली जात नाही.छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र पुन्हा त्याच जागी लावण्यात यावे. अटक केलेल्या बौद्ध समाजातील नागरिकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी दलित अत्याचारविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अॅड. मनोहर टाकसाळ यांनी केली. कारवाई चुकीचीगव्हाड याने ३० जून रोजी ग्रामसभा घेऊन ते तैलचित्र काढण्याचा ठराव पारित केला. मुळात ६ महिन्यांच्या आतील अतिक्रमण काढण्याचा अधिकार ग्रामपंचायतला आहे. हे चित्र ३० वर्षांपूर्वीचे होते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशित करून ते काढायला हवे; परंतु प्रत्यक्षात जिल्हाधिकाऱ्यांचा कोणताही आदेश नसताना ग्रामपंचायतने बेकायदेशीरपणे काढले. अॅड. बी. एच. गायकवाड,ज्येष्ठ विधिज्ञ
मांत्रिकाच्या कानमंत्राने घडला वरूड (बु्र)चा प्रकार
By admin | Updated: July 25, 2014 00:48 IST