ऑनलाइन लोकमत औरंगाबाद, दि. 6- दौलताबाद रोडवर सुरू असलेली अपघाताची मालिका थांबायला तयार नाही. नातेवाईक मैत्रिणीसोबत फिरायला जात असलेल्या दुचाकीस्वार तरुण, तरुणीला भरधाव एस.टी. बसने चिरडले. हा भीषण अपघात दौलताबाद रोडवरील शेळकेमामा ढाब्याजवळ आज सकाळी १० वाजेच्या सुमारास घडला. नेहा देवेंद्र काकडे(१८,ह.मु.शासकीय वसतिगृह,पुष्पनगरी) आणि दिपंकर अनिरु द्ध खंडारे(२२,ह.मु. पुणे, दोघेही मूळ रा. मेहुणाराजा, जि.बुलडाणा) असे मृताची नावे आहे. नेहा ही औरंगाबादेतील मिलिंद महाविद्यालयात बारावी विज्ञात शाखेत शिकत होती. तर दिपंकर हा पुणे येथे एका खाजगी कंपनीत नोकरीला होता. दोघेही मेहुणाराजा येथे शेजारीच राहणारे असून नेहा ही दिपंकरच्या चुलत मामाची मुलगी आहे. ९ दिवसापासून गावाकडे गेलेली नेहा गुरुवारी सायंकाळी औरंगाबादेत परतली. तर दिपंकर हा नेहाला भेटण्यासाठी रात्री औरंगाबादेत आला. रात्री मुक्काम केल्यानंतर शुक्रवारी सकाळी तो दुचाकी घेऊन नेहाच्या वसतिगृहाकडे गेला. तेथे तिला दुचाकीवर बसवून ते दोघेही दौलताबादकडडे फिरायला गेले होते. दौलताबादकडून औरंगाबादकडे येत होते. शेळकेमामा ढाब्याजवळ समोरुन ते दुसऱ्या एका वाहनाला ओव्हरटेक करीत असतानाच राज्य परिवहन महामंडळाची बस क्रमांक (एमएच-२० बीएल १७५१)विरुद्ध दिशेने येत होती. अचानक समोर आलेल्या दुचाकीस्वार नेहा आणि दिपंकर यांना बसने जोराची धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की,बसने दीपंकरला सुमारे ४० ते ५० फुट फरफटत नेल्याने रस्त्यावर रक्त,मासाचा सडा पडला होता. तर नेहा ही रस्त्यावर आदळली आणि बसखाली आल्याने ती जागीच ठार झाली. या अपघाताची माहिती मिळताच गस्तीवरील पोलीस हेड कॉन्स्टेबल रामदास पाटे, जमादार बाजीराव पगारे, कर्मचारी कुंदन आवारे यांननी घटनास्थळी धाव घेऊन नेहा आणि दिपंकर यांचे मृतदेह घाटीत हलवले.
दुचाकीस्वार मित्रमैत्रिणीला एसटीने चिरडले
By admin | Updated: January 6, 2017 17:16 IST