राजू नाजूकराव इंगळे (वय २४) आणि योगेश शंकर गुजरकर (२४, रा. कमळापूूर फाटा) अशी आरोपींची नावे आहेत. पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे म्हणाले की, एमआयडीसी सिडको ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमरनाथ नागरे, कैलास अन्नलदास, हवालदार मुनीर पठाण, राजेंद्र शेजुळ, दीपक शिंदे, अविनाश दाभाडे, विक्रांत पवार आणि गणेश जाधव हे २३ फेब्रुवारीला गस्तीवर असताना नारेगांव येथे दोनजण चोरीची मोटारसायकल विक्री करण्यासाठी आले असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली. पोलिसांनी लगेच नारेगाव येथील पाण्याच्या बंबाजवळ संशयित आरोपींना दुचाकीसह ताब्यात घेतले. त्यांच्याजवळील मोटारसायकलविषयी चौकशी केली असता ते घाबरले आणि उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. पोलिसांनी त्यांना ठाण्यात नेऊन खाक्या दाखविताच काही दिवसांपूर्वी एपीआय कॉर्नर येथील एका हॉटेलसमोरून ही दुचाकी चोरल्याची कबुली त्यांनी दिली. आरोपी राजू हा कमळापूर फाटा येथे एका गॅरेजवर मेकॅनिक आहे, तर आरोपी योगेश वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीचा कामगार आहे. या चोरट्यांकडून आणखी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली.
हॉटेलसमोरून दुचाकी चोरणाऱ्या दोन चोरट्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:05 IST