आडूळ : पाठीमागून भरधाव येणाऱ्या कारने शनिवारी दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तब्बल १०० फुटापर्यंत फेकले गेले. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघे व कारचालक असे तिघे जण गंभीर जखमी झाले. ही दुर्दैवी घटना शनिवारी सायंकाळी ५ वाजेदरम्यान औरंगाबाद-बीड राष्ट्रीय महामार्गावर आडूळ-रजापूर शिवारात घडली.
औरंगाबाद तालुक्यातील पिवळवाडी येथील रहिवासी त्रिंबक हिरालाल बमनावत (वय ५२) व रुपसिंग हरसिंग घुनावत (४०) हे दोघे दुचाकीवरुन (क्र. एम एच २० ए एक्स ६४०५) रजापूरहून शनिवारी सायंकाळी पिवळवाडीकडे परतत होते. त्याचदरम्यान पाचोडकडून औरंगाबादकडे भरधाव जाणारी कार (क्र एम एच ४३ ए एफ १०४) ने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यामुळे जवळपास पुढे शंभर फुटापर्यंत दुचाकीस्वार फेकल्या गेले. यात कारही रस्त्याच्या खाली जाऊन उलटली. यात कारचालक औरंगाबाद येथील रोकडे व दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांनी घेतली धाव
उल्लेखनीय बाब म्हणजे, घटनास्थळावरुन अवघे तीनशे फुटाच्या अंतरावर राष्ट्रीय महामार्गावर आपले कर्तव्य बजावणारे महामार्गाचे पोलीस उपनिरीक्षक हरेश्वर घुगे, सहाय्यक फौजदार बलभीम गोरे, पोलीस हवालदार राजू गोल्डे, दिलीप पाटील, ईश्वरसिंग जारवाल, पाचोड पोलीस ठाण्याचे रवींद्र क्षीरसागर यांनी तात्काळ अपघातस्थळी धाव घेतली व जखमींना साह्य करीत वाहतूक सुरळीत केली. १०८ रुग्णवाहिकेचे डॉ. अस्लम सय्यद,चालक तातेराव वाघ यांनी जखमींना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात घेण्यात आली. तपास सहायक पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोड पोलीस करीत आहेत.