बदनापूर : तालुक्यातील दाभाडी शिवारातील शेतात महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी बदनापूर पोलिसांनी आणखी दोन संशयीतांना अटक केली आहे.दाभाडी शिवारातील संतुकराव कोल्हे यांच्या ज्वारीच्या शेतात सोमवारी ता. २३ नोव्हेंबर रोजी एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. तेथील परिस्थिती पाहता या महिलेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याचे दिसून आले. तसेच मृतदेहाजवळ जुम्मेखान यांचे आधार कार्ड व ओळखपत्र सापडले होते. त्यावरून जुम्मेखान यांनीच हे कृत्य केल्याचा संशय घेऊन विठ्ठल उत्तम सावंत यांनी बदनापूर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली. त्यावरून बदनापूर पोलिसांनी संशयीत शेख जुम्मेखा न्यामत खॉ शेख (रा बानेगाव ता. भोकरदन) याच्याविरूध्द खून व बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली होती.त्यास चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली होती. ती संपल्याने त्यास पून्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. दरम्यान या प्रकरणी सतीष भीमराव इंगळे (२५ रा. डोंगरगाव) व संजय भीमराव रगडे (२९ रा.दाभाडी) या दोघांना शनिवारी अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.(प्रतिनिधी)
‘त्या’ खून प्रकरणी आणखी दोघांना अटक
By admin | Updated: November 29, 2015 23:14 IST