औरंगाबाद : राज्यातील पोलीस दलाने आदर्श घ्यावा अशा पद्धतीने वाहतूक सुरक्षा सप्ताहात आरएसपींच्या विद्यार्थ्यांचे संचालन औरंगाबादमध्ये झाले, अशी कौतुकाची थाप मारत येत्या दोन महिन्यांत शहर कचरामुक्त करण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून महानगरपालिकेला निधी देण्यात येईल. यामुळे शहर कचरामुक्त होईल, अशी ग्वाही पालकमंत्री रामदास कदम यांनी दिली. ते वाहतूक सुरक्षा सप्ताहाच्या समारोपप्रसंगी शनिवारी (दि. १६) बोलत होते. यावेळी खासदार चंद्रकांत खैरे, महापौर त्र्यंबक तुपे, आमदार अतुल सावे, इम्तियाज जलील, सुभाष झांबड, सतीश चव्हाण, उपमहापौर प्रमोद राठोड, नगरसेवक नंदकुमार घोडेले, रेणुकादास वैद्य, विकास जैन, गजानन बारवाल, माजी आमदार प्रदीप जैस्वाल, रशीद मामू, महसूल उपायुक्त विजयकुमार फड, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव व सर्व ठाण्यांचे प्रमुख आदी मान्यवरांची उपस्थिती होती. पोलीस आयुक्तालयातील देवगिरी मैदानावर पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आरएसपीच्या विद्यार्थ्यांच्या परेडचे आयोजन करण्यात आले होते.वाहतूक सुरक्षा सप्ताहाला १० जानेवारीपासून प्रारंभ झाला होता. त्याचा शनिवारी पोलीस आयुक्तालयातील देवगिरी मैदानावर पालकमंत्री कदम यांच्या उपस्थितीत समारोप झाला. यावेळी पालकमंत्र्यांनी परेडचे निरीक्षण केल्यानंतर सहभागी झालेल्या आरएसपीच्या १५ प्लाटूनने त्यांना सलामी दिली. यात राजर्षी शाहू महाराज विद्यालय, ज्ञानप्रकाश विद्यामंदिर, बळीराम पाटील शाळा, गोदावरी पब्लिक स्कूल, नूतन बहुउद्देशीय विद्यालय, शिशुविहार माध्यमिक विद्यालय, नारेगावातील महानगरपालिका माध्यमिक विद्यालय, कर्मवीर शंकरसिंग नाईक विद्यालय आणि सुभेदार रामजी आंबेडकर हायस्कूलच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा समावेश होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी केले. सप्ताहादरम्यान यंदा विशेषत: हेल्मेटसंदर्भात जनजागृतीवर भर देण्यात आला. १ फेब्रुवारीपासून हेल्मेटसक्ती केली जाणार आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आरएसपीच्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी ५६ विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांच्या मदतीने वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
दोन महिन्यांत शहर कचरामुक्त
By admin | Updated: January 17, 2016 00:03 IST