औरंगाबाद : भरधाव दुचाकीवरील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे (सीआयएसएफ) दोन जवान क्रांतीचौक उड्डाणपुलावरून फुटबॉलसारखे उडाले आणि पंचवीस फुटांवरून थेट पुलाच्या खाली कोसळले. दोन्ही जवान जागीच ठार झाले. ही दुर्घटना गुरुवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास क्रांतीचौक उड्डाणपुलावर घडली. डी. देवेंद्र (२५, रा. गुंटूर, मध्यप्रदेश) व एस. चैतन्य (२६, रा. विशाखापट्टणम्) अशी मृत जवानांची नावे आहेत. सीआयएसएफचे हे दोन जवान विमानतळ सुरक्षा यंत्रणेमध्ये कार्यरत होते. गुरुवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास ते रुग्णालयात जात असल्याची नोंद करून बाहेर पडले होते. त्यानंतर ते दोघे जण दुचाकी (क्र. एपी ०१ एस ९१२६) वरून आकाशवाणीकडून बाबा पेट्रोलपंपाच्या दिशेने जात होते. क्रांतीचौक उड्डाणपुलाच्या वळणावर भरधाव दुचाकी गतिरोधकावर उडाली. त्यानंतर पुलाच्या भिंतीवर आदळली. दुचाकीवरील दोन्ही जवान फुटबॉलसारखे उडून थेट पुलाच्या खाली फेकले गेले तर दुचाकी २० फूट घसरत जाऊन पुलावरच रस्त्याच्या मधोमध पडली. दोन जवानांपैकी एक जण तोंडावर तर एक जण डोक्यावर आदळला होता. क्रांतीचौक पोलीस ठाण्याच्या मोबाईल व्हॅनवरील कर्मचाऱ्यांनी दोघांना घाटीत नेले. डॉक्टरांनी तपासून दोघांनाही मयत घोषित केले. उस्मानपुरा ठाण्यात नोंद करण्यात आली. दोन आठवड्यांपूर्वीच या ठिकाणी अशाच पद्धतीने एका महाविद्यालयीन युवकाचा बळी गेला होता.
उड्डाणपुलावरून पडून दोन जवान ठार
By admin | Updated: November 14, 2015 00:54 IST