लातूर : आरटीओ कार्यालयात वाहनांची नोंदणी, वाहन परवाना काढल्यावर पूर्वी हातातच कागदपत्रे दिली जायची़ प्रादेशिक परिवहन विभागाने सप्टेंबर २०११ साली घरपोच योजना सुरू केली़ वाहनांची पासिंग, लायसन्स काढल्यावर ते घेण्यासाठी कार्यालयात खेटे मारावे लागू नये यासाठी नवी योजना अंमलात आणली़ मात्र, घरपोच सुविधा देण्यासाठी त्याचा खर्च मात्र वाहनधारकांच्या खिशातून घेण्यात आला़ लातूर आरटीओने पाच वर्षांत पोस्टाला १ कोटी ९६ लाख ३१ हजार ८५० रूपयांचा महसूल मिळवून दिला आहे़ वाहनधारकांचे खेटे वाचविण्यासाठी परिवहन विभागाने नवीन योजना अंमलात आणली खरी पण त्या योजनेत वाहनधारकांच्या खिशाला चाट लावण्यात आली आहे़ सप्टेंबर २०११ पासून कार्यालयात हातोहात कागदपत्रे देण्याची पध्दत बंद करण्यात आली आहे़ वाहनांचे रजिस्ट्रेशन, लायसन्स काढल्यावर ते घरच्या पत्त्यावर पाठविण्यात येत आहे़ यासाठी वाहनधारकांकडून स्वतंत्र अर्ज भरून घेतला जातो़ सप्टेंबर २०११ ते नोव्हेंबर २०१६ या कालावधीत पोस्टाच्या माध्यमातून वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र १ लाख ८९ हजार ९४४ व २ लाख २ हजार ८८ लायसन्स घरपोच करण्यात आली आहेत़ पोस्टाने पाठविण्यात येणारे स्मार्ट कार्ड घरपोच करण्यासाठी ५० रूपयांचे शुल्क आकारण्यात आले आहे़ एकूण ३ लाख ९२ हजार ६३७ स्मार्ट कार्ड घरपोच करण्यासाठी पोस्टाला लातूरच्या आरटीओ कार्यालयाकडून १ कोटी ९६ लाख ३१ हजार रूपये महसूल मिळाला आहे़ डबघाईला आलेल्या पोस्टाला पाच वर्षांत जवळपासून दोन कोटीचा महसूल मिळाल्याने चांगलाच आधार झाला आहे़
स्मार्टकार्डद्वारे पोस्टाला दोन कोटींचा धनलाभ
By admin | Updated: December 24, 2016 21:31 IST