माजलगाव : येथील आठवडी बाजार इतरत्र स्थलांतरीत करण्याच्या न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने दोघांनी पालिकेसमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला़ पोलिसांनी त्यांना वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला़जगदीश साखरे, मारोती वांडेकर (दोघे रा़ माजलगाव) अशी त्यांची नावे आहेत़ माजलगाव पालिकेकडे सध्या आठवडी बाजारासाठी जागा उपलब्ध नाही़ त्यामुळे सध्या आठवडी बाजार गजानन मंदिराजवळील रस्त्यावर भरविला जातो़ या बाजारामुळे रहिवाशांना याचा फटका सहन करावा लागत आहे़ साखरे, वांडेकर यांनी बाजार हटविण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले़ बाजार इतरत्र स्थलांतरीत करावा, असे आदेश न्यायालयाने वर्षभरापूर्वी दिले होते;पण पालिकेने न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली नाही़ त्यामुळे आजही बाजार गजानन महाराज मंदिरालगतच भरतो़ आदेशाची अंमलबजावणी न केल्याने न्यायालयाने पालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे खाते सील केले होते़ त्यानंतर मुख्याधिकारी अब्दूल सत्तार यांनी २० जून रोजी जाहीर प्रगटन काढून बाजार सर्व्हे क्ऱ ३८० मध्ये भरविला जाणारी असल्याचे स्पष्ट केले़ सर्व्हे क्ऱ ३८० पालिकेच्या ताब्यात नसल्याने तेथे बाजार भरविता येणार नाही, असे पत्र तहसीलदारांनी पालिकेला दिले होते़ याउपरही बुधवारी सर्व्हे क्र ३८० मध्ये बाजार भरविण्याचा प्रयत्न केला़ यावेळी माजलगाव विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बाजाराला विरोध करत दगडफेक केली होती़ त्यामुळे बाजाराच्या जागेचा प्रश्न ऐरणीवर आला होता़ गुरुवारी सकाळी जगदीश साखरे व मारोती वांडेकर यांनी पालिका कार्यालयाच्या आवारात रॉकेल स्वत:च्या अंगावर ओतले़ त्यानंतर काडी ओढून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला़ पोलिसांनी व पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अग्निशामक वाहनातून त्यांच्या अंगावर पाणी सोडले़ दोघांना ग्रामीण रुग्णालयात भरती केले आहे़ उशिरा शहर पोलिसांत गुन्हा नोंद झाला़ (वार्ताहर)
माजलगावात दोघांचा आत्मदहनाचा प्रयत्न
By admin | Updated: August 7, 2014 23:34 IST