परभणी : शहर महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या नव्या पाणीपुरवठा योजनेसाठी अडीच कोटी रुपयांची तरतूद करण्यास सर्वसाधारण सभेत मान्यता मिळाली आहे. त्यामुळे या योजनेसाठी ४० कोटी रुपये मिळतील.परभणी शहराला सध्या ३० वर्षांपूर्वीच्या जुन्या योजनेतूनच पाणीपुरवठा केला जातो. राहाटी येथील बंधाऱ्यातून शहरात पाणी येते. जलवाहिनीला गळती असल्याने पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणावर आहे. मागील काही वर्षांत शहराची लोकसंख्या वाढली. परंतु जुन्या योजनतूनच पाणी पुरविले जाते. त्यामुळे हे पाणी अपुरे पडत आहे. त्यासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. जिंतूर तालुक्यातील येलदरी येथून थेट परभणीत पाणी आणण्यात येणार असून, त्याचे पहिल्याचे टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्याच्या कामाला अजून सुरूवात झाली नाही. दुसऱ्या टप्प्यामध्ये शहरात जलवाहिनी अंथरणे, जलकुंभ उभारणे अशी कामे होणार आहेत.या कामाला गती देऊन पूर्ण करावयाचे झाल्यास त्यासाठी निधीची आवश्यकता आहे. हा निधी उभारण्यासाठी मनपाला लोकवाटा जमा करणे गरजेचे असल्याने हा प्रश्न दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षनेते भगवान वाघमारे यांनी उचलून धरला. तेराव्या वित्त आयोगाच्या निधी अंतर्गत आलेल्या अडीच कोटी रुपयांचा निधी पाणीपुरवठा व वीज देयक भरण्यासाठी वापरावा, अशी सूचना वाघमारे यांनी केली. जर हा निधी लोकवाटा भरण्यासाठी वापरल्यास आपल्याला शासनाकडून ४० कोटी रुपये येतील व पाणीपुरवठा योजना जलदगतीने राबविता येईल, असे त्यांनी सांगितले. सभागृहाने हा मुद्दा मान्य करीत पाणीपुरवठा योजना आणि वीजबिलासाठी अडीच कोटी रुपयांची तरतूद केली. (प्रतिनिधी)शहराला पाणीटंचाईचे चटकेशहरात सध्या नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ८ ते १० दिवसांतून एक वेळ शहरवासियांना पाणी मिळत आहे. त्यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. मनपाकडे पुरेसे पाणी उपलब्ध असतानाही नागरिकांना टंचाईला तोंड द्यावे लागते. मनपाने पाणीपुरवठ्याचे नियोजन केल्यास हा प्रश्न सुटू शकतो. पाणीप्रश्नावरही अनेक नगरसेवकांनी आपली नाराजी सभागृहासमोर मांडली.
नव्या योजनेसाठी अडीच कोटी
By admin | Updated: July 13, 2014 00:21 IST