काक्रंबा : तुळजापूर तालुक्यातील काक्रंब्यासह परिसरातील अन्य गावांच्या शिवारात असलेले बहुतांशी बंधारे डागडुजीला आले आहेत. पावसाळ्यापूर्वी ही बाब लघु पाटबंधारे विभागाने फारशी गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळे पावसाचे पाणी आले तसे वाहून गेले. या प्रकाराबाबत शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.काक्रंब्यासह व्होनाळा, बारुळ व वाणेगाव आदी गावांतील शिवारात शासनाने लाखो रुपये खर्च करुन कोल्हापुरी बंधारे उभारले. परंतु, सध्याचे चित्र पाहिल्यानंतर ज्या उद्देशाने हे बंधारे बांधले तो उद्देश साध्य होताना दिसत नाही. त्याला कारणही तसेच आहे. बहुतांशी बंधारे दुरूस्तीला आले आहेत. काक्रंबा शिवारात यापैकीच एक बंधारा. सात वर्षापूर्वी लाखो रुपये खर्चून तब्बल ५७ दरवाज्यांचा भलामोठा बंधारा उभारला. मात्र, सुरुवातीची एक वर्ष वगळता आजातागायत या बंधाऱ्याला ना दरवाजे बसविले ना किरकोळ दुरुस्ती केली. त्यामुळे एक थेंबभर पाणीसुद्धा आडले नाही. जसे आले तसेच वाहून गेले. बारुळ गावानजीक दीड वर्षापूर्वी एक-दोन नाही तर तब्बल २३ लाख रुपये खर्चून २८ दरवाज्यांचा कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आला. परंतु, संबंधित ठेकेदाराने बंधाऱ्याचे दरवाजे बसविले नाहीत. याकडे अधिकाऱ्यांनीही लक्ष दिले नाही. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात बंधाऱ्यातून पाणी आले तसे वाहून गेले. अशीच परिस्थिती व्होनाळा व वानेगाव येथील कोल्हापुरी बंधाऱ्याची आहे.
बंधारे दुरुस्तीकडे कानाडोळा
By admin | Updated: August 29, 2016 00:55 IST