चाकूर : माजी जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे चाकूर तालुकाध्यक्ष हणमंतराव पाटील यांना जबरदस्तीने विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात शुक्रवारी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकूर तालुक्यातील अजनसोंडा येथील हणमंतराव पाटील हे १ मार्च २०१७ रोजी गावातील कार्यक्रम आटोपून सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कारमधून (एमएच २४ एएफ ७७७१) ते चाकूरकडे निघाले होते. दरम्यान, चापोली येथील महाविद्यालयानजीक तिघांनी कारला हात दाखविला. त्यामुळे हणमंतराव पाटील यांनी आपली कार थांबविली. आपल्याला अलगरवाडी पाटीला जायचे आहे असे म्हणून तिघे कारमध्ये बसले. कार अलगरवाडी पाटीच्या अलीकडेच थांबविण्यास सांगितले. तेथे दोघेजण दुचाकीसह थांबले होते. कार थांबताच यातील एकाने कारची चाबी काढून घेतली. तो पहेलवान होता. त्यानंतर इतर पाच जणांनी हणमंतराव पाटील यांना कारच्या पाठीमागील बाजूस नेले. त्यांना बळजबरीने विषारी द्रव पाजले. दरम्यान, यावेळी हणमंतराव पाटील यांनी जि.प.चे माजी सदस्य युवराज पाटील यांना माहिती दिली. त्यानंतर माजी आमदार बाबासाहेब पाटील यांनाही ही माहिती देण्यात आली. पाटील यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर प्रकृती सुधारल्याने त्यांनी शुक्रवारी चाकूर पोलिसांना आपला जबाब दिला. या जबाबानुसार अनिल वाडकरसह अन्य पाच साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चाकूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे हे करीत आहेत.
राष्ट्रवादी तालुकाध्यक्षास जीवे मारण्याचा प्रयत्न
By admin | Updated: April 8, 2017 21:44 IST