उस्मानाबाद : शहरातील गणेश नगर भागात असलेल्या युको बँकेचे एटीएम मशीन फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केला़ ही घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून, या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील गणेश नगर भागात युको बँकेची एटीएम मशीन आहे़ ग्राहकांच्या सेवेसाठी या एटीएमचा कक्ष २४ तास खुला ठेवण्यात येतो़ चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास या एटीएम कक्षात चोरीच्या उद्देशाने प्रवेश केला़ प्रारंभी आतील सीसीटीव्ही कॅमेरे चोरट्यांनी फोडले़ नंतर एटीएम मशीन फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला़ ही घटना शनिवारी सकाळी समोर येताच शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला़ या प्रकरणी युको बँकेचे व्यवस्थापक रोहन संतोष मुन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सदरील घटनेचा अधिक तपास पोहेकॉ सूर्यवंशी हे करीत आहेत़(प्रतिनिधी)
एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न
By admin | Updated: June 13, 2015 23:54 IST