परभणी: जिंतूर -परभणी महामार्गावरील कृषी महाविद्यालयाजवळ ट्रक-दुचाकीचा समोरासमोर अपघात झाल्याने दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झाल्याची घटना २६ आॅगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली.जिंतूर तालुक्यातील वरुड नृसिंह येथील ज्ञानेश्वर सखाराम पवार (३५) व रामचंद्र लक्ष्मणराव डुकरे (४०) हे दोघे जण परभणी येथून दुचाकी क्रमांक (एम.एच.२१-यू.१८१३) ने गावाकडे जात होते. दरम्यान, परभणीशहरालगत असलेल्या कृषी महाविद्यालयाजवळ जिंतूरहून परभणीकडे येणाऱ्या भरधाव ट्रकने (एम.एच.२२-९००) या दोन वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली. धडक एवढी जोराची होती की, यामध्ये दुचाकीवरील ज्ञानेश्वर सखाराम पवार, रामचंद्र लक्ष्मणराव डुकरे (रा.वरुड नृसिंह ता.जिंतूर ) हे दोघे जण जागीच ठार झाले. या प्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. (प्रतिनिधी)