औरंगाबाद : महापालिकेची सर्वसाधारण सभा आज श्रद्धांजली अर्पण करण्याच्या प्रकरणामुळे गाजली. माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांना श्रद्धांजली अर्पण करण्याऐवजी महापौर कला ओझा यांनी चक्क माजी मुख्यमंत्री अतुल सावे असे संबोधित करून श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या या वक्तव्यामुळे सभागृहात शेम...शेम..चा नारा भाजपा नगरसेवकांनी दिला. तर उर्वरित नगरसेवक, अधिकारी हास्यकल्लोळात बुडाले. अंतुले आणि अतुल या शब्दातील भेद महापौरांना ओळखता न आल्यामुळे त्यांनी अतुल सावे यांना श्रद्धांजली असा ठराव पारित केला. महापौर कला ओझा यांनी आजवर अनेकदा शब्दोच्चार करताना चुकीची वक्तव्ये केली आहेत. सभागृहात व इतर सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या तोंडून चुकीची वक्तव्ये निघाल्यामुळे त्यांना पक्षनेत्यांनी वारंवार समज दिली. परंतु त्यांच्या उच्चारांमध्ये विशेष अशी सुधारणा झाली नसल्याचे आज पुन्हा स्पष्ट झाले. गेल्या महिन्यात नगरसेवक राजगौरव वानखेडे यांचे वडील हरिभाऊ वानखेडे यांचे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याऐवजी ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांचे नाव महापौरांनी घेतले होते. त्यावेळीही सभागृहात भाजपा नगरसेवकांनी दुरुस्तीची मागणी केली होती. माजी महापौर विमल राजपूत यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना अभिवादन केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे महापौरपद पक्षाने काढून घेतले होते.महापौर ओझा यांनी सावे यांना श्रद्धांजली वाहिल्याचे शब्द तातडीने दुरुस्त करून अंतुले यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार असल्याचा बदल सभागृहात सुचविला.
अंतुलेंऐवजी चक्क अतुल सावेंना श्रद्धांजली
By admin | Updated: December 21, 2014 00:17 IST