चितेगाव : खाजगी कंपनीच्या केबल टाकण्यासाठी खोदलेल्या नालीजवळील वडाचे मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने औरंगाबाद-पैठण मार्गावरील वाहतूक दुपारी अडीच तास ठप्प झाली होती.केबल टाकण्यासाठी एका खाजगी कंपनीने रस्त्यालगत मोठी नाली खोदली आहे. त्यामुळे गेवराई ग्रामपंचायतीसमोर असलेल्या या झाडाच्या मुळ्या उघड्या पडल्या होत्या. मंगळवारी दुपारी ३ वाजता ते भररस्त्यात कोसळले. त्यावेळी वाहने किंवा अन्य कोणी नव्हते, त्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही; मात्र झाड कोसळल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांची दुतर्फा रांग लागून वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे सरपंच विजय जाधव यांनी दुचाकी व लहान चारचाकी वाहनांसाठी पुलाजवळून पर्यायी रस्ता मोकळा करून दिला. काही वाहने चितेगावमार्गे वाळूजकडे वळाली.या प्रकारात चितेगाव औद्योगिक वसाहतीतील कामगारांच्या बसगाड्यांचे मोठे हाल झाले. पैठणहून औरंगाबादकडे जाणारी वाहने गेवराईपासून परत आल्याने त्यांना गेवराई येथे दोन वेळा टोल भरावा लागला.
झाड कोसळले; वाहतूक ठप्प
By admin | Updated: September 24, 2014 01:04 IST