बीड : मागील काही दिवसांपासून बसस्थानकांतील चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली असून याला नियंत्रणात आणण्यासाठी ना पोलीसांनी उपाययोजना केल्यात ना राज्य परीवहन महामंडळाने. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.जिल्ह्यात आठ आगारांसह सात मिनी बसस्थानके आहेत. बीड, अंबाजोगाई, परळी, गेवराई या बसस्थानकांमध्ये दररोज हजारो प्रवाशांची ये-जा असते. हे बसस्थानकेही मोठे आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून बीड बसस्थानकासह माजलगाव, परळी आणि अंबाजोगाई बसस्थानकाम चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. बीडमध्ये तर एका आठवड्यात तीन मोठ्या चोऱ्या झाल्या.सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने बसस्थानकांमध्ये प्रवाशांची मोठी वर्दळ असते. यामुळे महामंडळाच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तिकीट दरही वाढविल्याने यामध्ये आणखीनच भर पडली आहे.मात्र प्रवाशांना महामंडळाकडून कुठल्याच सोयी-सुविधा दिल्या जात नाहीत. सुविधा तर दुरच परंतू त्यांच्या सुरक्षिततेबाबतही महामंडळ अनभिज्ञ असल्याचे दिसून येते. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठभ त्यांनी कसल्याच उपाययोजना केलेल्या नाहीत. पोलीसांची संख्याही अपुरी पडत असून सीसीटीव्ही कॅमेरेही नाहीत. त्यामुळे चोरांना अधिकच बळ मिळत आहे. स्थानकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून पोलीसांची संख्या वाढवावी, या मागणीसाठी जनाधार प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अनुप मंत्री यांनी दोन वेळेस आवाज उठविला परंतू अद्यापही याची दखल महामंडळाने घेतलेली नाही. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी महामंडळाला नसल्याचा आरोप मंत्री यांनी केला आहे. बसस्थानकांतील सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना करून होणाऱ्या चोऱ्या थांबवाव्यात अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.याबाबत विभागीय वाहतूक अधिकारी उद्धव वावरे म्हणाले, आम्हाला तसे वरिष्ठांकडून कुठलेच पत्र नाही. पोलीसांना पत्र बंदोबस्त वाढविण्यासाठी पत्र दिलेले आहेत. (प्रतिनिधी)
प्रवासी सुरक्षा वाऱ्यावर
By admin | Updated: May 26, 2015 00:48 IST