बीड : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या सौर दुहेरी पंप योजनेमध्ये शिरूर तालुक्यातील तिंतरवणी ग्रामपंचायतीच्या उपक्रमाची दखल थेट केंद्र सरकारने घेतली आहे. दिल्लीमध्ये नुकतेच तिंतरवणी योजनेचे सादरीकरण करण्यात आले.जिल्ह्यात ११५ ग्रामपंचायती अंतर्गत सौर दुहेरी पंप योजना राबविली जाते. तिंतरवणी ग्रामपंचायत यात ‘रोल मॉडेल’ म्हणून पुढे येत आहे. बोअरवर सौर पॅनलद्वारे विद्युत पंप बसविला आहे. लोखंडी मनोऱ्यावर ५ हजार लिटर क्षमतेची टाकी बसविली आहे. यातून गावकऱ्यांना २४ तास पाणीपुरवठा केला जातो. पाण्याच्या टाकीत सेन्सर बसविले असून, सौरपंप आपोआप चालू-बंद होतो. त्यामुळे पाणी वाया जात नाही. विजेचीही बचत होते. जुन्या हौदाची दुरुस्ती करून जनावरांना पाण्याची व्यवस्था केली आहे. यांत्रिकी उपविभागातील शाखा अभियंता एम.एम. मोमीन यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प साकारला.भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या संचालकांमार्फत पंतप्रधान कार्यालयाने तिंतरवणीत राबविलेल्या उपक्रमाची माहिती घेतली. तिंतरवणीची योजना देश पातळीवर पोहोचल्याने जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित, निवृत्त शाखा अभियंता आय.ए. पठाण, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एस. चव्हाण, मंजूर अहमद, अल्पसंख्याक कर्मचारी संघटनेचे सय्यद रफियोद्दीन, मोमीन जकियोद्दीन, जि.प. अभियंता संघटनेचे भोरे आदींनी स्वागत केले. (प्रतिनिधी)
सौर पंप योजनेचा ‘तिंतरवणी पॅटर्न’ दिल्लीत
By admin | Updated: July 4, 2016 00:32 IST