मोहन बोराडे, सेलूग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळताच हाताला काम मिळावे यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थापन झाल्या़ परंतु, सेलू येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या जागेचा प्रश्न अनेक वर्षांपासून लालफितीत अडकल्यामुळे प्रशिक्षण संस्थेला घरघर लागली आहे़ सेलू येथे नगरपालिकेच्या स्टेडियममध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था चालते़ जुनाट झालेल्या इमारतीत कुठल्याच सुविधा नसतानाही प्रशिक्षण संस्थेचे वर्ग सुरू आहेत़ हादगाव पावडे शिवारात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नवीन इमारतीसाठी अडीच एकर जागेचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे़ परंतु, अनेक वर्ष उलटूनही प्रस्ताव जैसे थे आहे़ प्रशिक्षण संस्थेच्या नवीन इमारतीसाठी आठ वर्षांपूर्वी ३ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला होता़ मात्र जागा नसल्यामुळे आलेला निधी परत गेला़ परिणामी औद्योगिक प्रशिक्षण संस्था नगरपालिकेच्या जुनाट झालेल्या इमारतीत जैसे थे आहे़ या प्रशिक्षण संस्थेत ड्रेस मेकिंक, वेल्डर, फि टर, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रीशयन हे ट्रेड आहेत़ प्रत्येक ट्रेडसाठी १६ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो़ या संस्थेत सर्वाधिक ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटूंबातील विद्यार्थी प्रवेश घेतात़ प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर महानगरात जावून खाजगी कंपन्यांमध्ये नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करतात़ प्रशिक्षण घेताना या विद्यार्थ्यांना कुठल्याही सुविधा मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांची कुंचबणा होत आहे़ जुनाट झालेल्या इमारतीत स्वच्छता गृह व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही़ संस्थेला दोन महिन्यापुर्वी प्राप्त झालेले जनरेटर देखील पडून आहे़ त्यामुळे वीज गेल्यानंतर अनेक ट्रेडमध्ये अडचण निर्माण होते़ प्रशिक्षण संस्थेतील भांडारपालचे पद रिक्त आहे़ त्यामुळे नवीन साहित्याची खरेदी करण्यास अडचण निर्माण होत आहे़ सकाळी उशीरापर्यंत संस्थेमध्ये सुरक्षा रक्षकाव्यतिरिक्त कोणीही दिसत नाही़ दुपारनंतर मात्र कर्मचारी व विद्यार्थ्यांची ये- जा सुरू असते़
प्रशिक्षण संस्थेला लागली घरघर
By admin | Updated: August 20, 2014 00:20 IST