लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : परंपरेने ग्रामीण मातीत रुजलेला सांस्कृतिक वारसा तंत्रयुगात जोपासण्याचे काम हर्सूल गावकरी करीत आहे. हनुमान मंदिर ट्रस्टतर्फे नागपंचमीनिमित्त गुरुवारी हर्सूलच्या हनुमान मंदिरात आयोजित ‘कलगी-तुरा’ स्पर्धेत ‘हनुमान मकरध्वज कुस्ती’ या कलगीवर चार पार्ट्यांची शाब्दिक झुंज अखेर सायंकाळी बरोबरीत सुटली.कलगी-तुरा स्पर्धेत हर्सूल, चिमणपीरवाडी, गोलवाडी येथील चार पार्ट्यांनी कलगी व तुरा सादर करून एकमेकांना गायनातून उत्तर दिले. सकाळी ११ वाजेला सुरू झालेल्या या स्पर्धेने रिमझिम पावसातही ‘टाळ व ढोलकी’च्या ठेक्याने सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते.‘भीम जरासन कुस्ती’चा तुरा सादर करीत, चारही पार्ट्यांनी बरोबरीत आपली शाब्दिक ताकद कायम ठेवली. कलावंतांच्या हजरजवाबी कवनातून पार्ट्यांच्या शाब्दिक भांडाराला उपस्थित प्रेक्षक व श्रोत्यांनी टाळ्यांच्या कटकडाटातून दाद दिली.युवक मोबाइल चित्रणात दंग...हर्सूल येथे परंपरेनुसार अनेक वर्षांपासून सातत्याने दरवर्षी ‘कलगी-तुरा’चे आयोजन केले जाते. या शाब्दिक युद्धाचे चित्रीकरण अनेक युवक आपल्या मोबाइलमध्ये करताना दिसत होते. यावेळी टेकचंद वाणी पहेलवान, चंदूलाल समालपुरे, गंगारामअप्पा, हिरामण गुंजाळे, गोविंद राठोड आदींच्या कलगी-तुºयाच्या पार्ट्या होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नगरसेवक पूनम बमणे, शेख लाल पटेल, बाबूलाल गुंजाळे, फकीरचंद हरणे, रूपचंद गुंजाळे, प्रल्हाद गुंजाळे, माधव वाणी, हरिदास हरणे, रंगनाथ गुंजाळे आदींनी परिश्रम घेतले.
हर्सूल परिसरात कलगी-तुरा रंगला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 00:43 IST