मागोवा २०२० : कोरोनाच्या दहशतीखाली सरले वर्ष
सुनील घोडके
खुलताबाद : तालुका हा धार्मिक व पर्यटनासाठी प्रसिद्ध मानला जातो. मात्र कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन लावण्यात आले. आणि पर्यटनस्थळे बंद पडली. त्यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेल्या जनतेवर उपासमारीची वेळ आली.
२०२० हे वर्ष म्हटले की, आयुष्यभर सर्वांच्या लक्षात राहणारे वर्ष आहे. खुलताबाद तालुक्यात वेरूळ येथे जगप्रसिद्ध वेरूळ लेणी, बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर, खुलताबाद येथील भद्रा मारुती मंदिर, सुफी संताच्या विविध दर्गा, औरंगजेब यांची कबर, प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हैसमाळ, शुलीभंजन येथील दत्तधाम मंदिर यासह विविध धार्मिकस्थळे असल्याने परिसरातील हजारो लोकांचा पर्यटन व भाविकांवरच व्यवसाय आहे. मार्च महिन्यापासून वेरूळ लेणी व धार्मिकस्थळे कोरोनामुळे बंद झाल्याने हॉटेल, लॉज, छोटे मोठे विक्रेते, हॉकर्स अशा जवळपास हजारो लोकांचा व्यवसाय बंद पडला आणि उपासमारीची वेळ आली.
खुलताबाद तालुक्यात जून ते ऑगस्ट महिन्यात जोरदार पाऊस झाल्याने सर्वात मोठा गिरिजा मध्यम प्रकल्प तसेच इतर सर्व लघुप्रकल्प ओव्हरफ्लो झाले. तब्बल दहा वर्षांनंतर तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे, तर दुसरीकडे अतिपावसाने खरीप हंगामातील पिके पाण्याखाली गेल्यानेे यंदा कापूस, मका, सोयाबीन पिके गेली.
फोटो : : वेरूळ व खुलताबाद येथील धार्मिकस्थळे नऊ महिने बंद असल्याने असा शुकशुकाट परिसरात दिसत होता.