बीड : वस्तीशाळा शिक्षकांना शासनादेशानुसार कायमस्वरुपी सेवेत सामावून घेण्यात आले खरे;पण आता पडताळणीसाठी जुन्या रेकॉर्डची मागणी झाल्याने कागदपत्रे गोळा करताना शिक्षकांची दमछाक होत आहे. पडताळणीसाठी अडवणूक करु नका, अशी मागणी राज्य प्राथमिक वस्तीशाळा संघाने केली आहे. जिल्ह्यात पूर्वीच्या ३०५ वस्तीशाळा आहेत. जानेवारी २०१४ मध्ये ३५२ स्वयंसेवकांना नियुक्त्या देण्यात आल्या. त्यानंतर बंद वस्तीशाळेतील १४७ पैकी ११० जणांनाही नियुक्त्या मिळाल्या. त्यामुळे आजघडीला वस्तीशाळा शिक्षकांची संख्या ७५५ वर पोहोचली आहे. या सर्वांना कायमस्वरुपी सेवेत सामावून घेतले आहे. मात्र, यापैकी काही जण स्वयंसेवक नसतानाही त्यांनी नियुक्त्या मिळविल्या असल्याच्या तक्रारी जि.प. कडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने सीईओ राजीव जवळेकर यांनी सामान्य प्रशासन विभागामार्फ त एक पत्र काढून नियुक्या दिलेल्या वस्तीशाळा शिक्षकांच्या कागदपत्रांच्या पडताळणीचे आदेश दिले. पडताळणीला विरोध नाही मात्र, इतके जुने रेकॉर्ड मिळवायचे कासे? असा प्रश्न वस्तीशाळा शिक्षकांपुढे आहे. कारण वस्तीशाळा शिक्षकांना पहिल्या नियुक्त्या देताना शालेय समितीला अधिकार दिले होते. काही स्वयंसेवकांचे मानधन केंद्रीय शाळेतून दिले जायचे तर काहींचे बँक खात्यावर जमा होत होते.१४ वर्षांपासून संघर्ष२००० मध्ये वाड्या- वस्त्यांवर शिक्षणाची गंगोत्री पोहोचविण्यासाठी शासनाने वस्तीशाळा सुरु केल्या होत्या. १० विद्यार्थी व एक किमी अंतरापर्यंत शाळा नसलेल्या ठिकाणी वस्तीशाळा सुरु झाल्या. त्यावर बारावी उत्तीर्ण स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर स्वयंसेवकांना पोस्टल डीएड करण्याची संधी शासनाने उपलब्ध करुन दिली. त्यानंतरच सर्वांनाच सेवेत कायमस्वरुपी सामावून घेतले. दरम्यान, स्वयंसेवकांनी अतिशय तुटपुजंच्या मानधनावर काम केलेले आहे. आता सामावून घेतले; पण पडताळणीच्या नावाखाली आडवणूक केली जात असल्याचे वस्तीशाळा शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष आत्माराम आगळे म्हणाले. (प्रतिनिधी)अडवणूक थांबवावस्तीशाळा शिक्षकांना आता कुठे न्याय मिळाला आहे. शिक्षकांची अडवणूक थांंबवावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने चंद्रकांत आर्सूळ, आत्माराम आगळे, हिरामण कांगरे, विठ्ठल फुलझळके, लाला सालगुडे, सतीश मस्के , बाळासाहेब घुमरे, निलेश क्षीरसागर, मुक्तीराम भोसले, राजाभाऊ राठोड, विष्णू पारखे यांनी केली आहे. आंदोलनाचा इशाराही दिला आहे.या कागदपत्रांची मागणीचौदा वर्षांच्या शिक्षक हजऱ्या, वेतन वितरण अभिलेख, विद्यार्थी संख्या आदींची माहिती सीईओ राजीव जवळेकर यांनी मागविली आहे. सेवेत सामावून घेण्याकरता केवळ शैक्षणिक कागदपत्रे, वय, जातीचे प्रमाणपत्र, नियुक्तीचे पत्र इत्यादी आवश्यक आहे. अनावश्यक कागदपत्रे मागवून वस्तीशाळा शिक्षकांना नाहक वेठीस धरले जात असल्याचा आरोप राज्य वस्तीशाळा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत आर्सूळ यांनी केला.
'रेकॉर्ड' साठी दमछाक !
By admin | Updated: July 28, 2014 00:54 IST