उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदासाठी गुरूवारी मतदान झाले होते. याची मतमोजणी शनिवारी सकाळी आठ वाजता महसूल भवन येथे होणार असून, या निकालाकडे जिल्हाभराचे लक्ष लागले आहे. उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या पंधरा जागांसाठी तब्बल ९८.९५ टक्के इतके विक्रमी मतदान झाले आहे. राष्ट्रवादी-भाजपा विरूध्द काँग्रेस-शिवसेना असा दुरंगी सामना झाला असून, दोन्ही पॅनलने ही निवडणूक कमालीच्या प्रतिष्ठेची केली होती. ८५६ मतदार असलेल्या या निवडणुकीमध्ये तब्बल ८४८ जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात प्रथमच राष्ट्रवादीची भाजपासोबत युती झाली. त्यामुळे ही युती किती फलदायी ठरते, याचे उत्तरही शनिवारी मिळणार आहे. विविध मतदारसंघातील राष्ट्रवादीचे प्राबल्य पाहता राष्ट्रवादी व भाजपाला जिल्हा बँकेत स्पष्ट बहुमत मिळेल, अशी आशा आहे. तर दुसरीकडे तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-शिवसेना पॅनलनेही प्रचारात मुसंडी मारलेली असल्याने सावंत यांचा पॅटर्न चमत्कार घडवेल, असा विश्वास काँग्रेस-सेनेकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान, माजी आ. ज्ञानेश्वर पाटील, जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक सुनील चव्हाण, जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष बापूराव पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधीर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, भाजपाचे जि. प. सदस्य कैैलास शिंदे, विकास बारकूल, सतीश दंडनाईक, काँग्रेसचे विद्यमान तालुकाध्यक्ष बिभीषण खामकर, नारायण समुद्रे, सुग्रीव कोकाटे, शिवाजी भोईटे सूर्यभान लिमकर यांच्यासह दिग्गज उमेदवारांना या निवडणुकीत मतदार काय कौल देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (प्रतिनिधी)
आज कळणार बँकेचे कारभारी
By admin | Updated: May 9, 2015 00:53 IST