वाळूज महानगर : आखाती देशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ४२ बेरोजगारांना ३५ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या तिघांना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विशेष म्हणजे या फरार आरोपींचा शोध पोलिसांनी नव्हे, तर फसवल्या गेलेल्या युवकांनीच लावल्याचे आज उघडकीस आले.आकाश शर्मा याने वाळूज औद्योगिक क्षेत्रातील बेरोजगार युवकांना आखाती देशात नोकरी देण्याचे आमिष दाखविले होते. दोन महिन्यांच्या कालावधीत त्याने ४२ बेरोजगार तरुणांकडून प्रत्येकी ६० ते ८० हजार रुपये उकळले. त्यांना ३० तारखेला कुवैतला विमानाने जाण्यासाठी मुंबईला बोलावून घेतले. हे युवक मुंबईला गेल्यानंतर आकाशने त्यांना पासपोर्टवर स्टॅम्प व स्वाक्षरी बाकी असल्याची थाप मारून लॉजमधून पलायन केले. या प्रकरणी पवनसिंह परमात्मा सिंह यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.रविवारी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे फौजदार राहुल भदरगे, पोहेकॉ. रमेश सांगळे, पोकॉ. बाळासाहेब आंधळे, सुरेश म्हस्के आदींच्या पथकाने नालासोपारा पोलीस ठाण्यात जाऊन या तिघांना ताब्यात घेतले. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता १२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.सुरुवातीला श्रेय लाटण्यासाठी या आरोपींना आम्हीच पकडल्याची माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली होती; मात्र फसवणूक झालेल्या बेरोजगारांनी आपण या आरोपीला पकडल्याचे सांगितल्यामुळे श्रेय लाटण्याचे प्रयत्न करणाऱ्या पोलीस पथकाचे चेहरे मात्र उतरले होते. विशेष म्हणजे कालच पोलिसांनी आपण स्वत:च आरोपी पकडल्याचा दावा केला होता.
तिघांना १२ पर्यंत पोलीस कोठडी
By admin | Updated: December 9, 2014 01:01 IST