औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील सरकारी दवाखान्यांमधील रिक्त पदे आणि वैद्यकीय सोयी-सुविधांचा अभाव यासंदर्भात खासदार इम्तियाज जलील यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर गुरुवारी (दि.८ जुलै) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होणार आहे.
रिक्त पदे भरण्यासंदर्भात राज्याचे महाधिवक्ता मंगळवारी माहिती (रोड मॅप) सादर करणार होते; मात्र आज ते इतर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहणार असल्यामुळे औरंगाबाद खंडपीठातील जनहित याचिकेच्या सुनावणीवेळी हजर राहू शकत नाहीत, असे खंडपीठास सांगण्यात आले. याचिकाकर्ते खा. जलील व्यक्तीश: हजर होते.
राज्य शासनातर्फे मुख्य सरकारी वकील डी.आर. काळे आणि सहायक सरकारी वकील सुजित कार्लेकर आदी हजर होते.
केंद्र शासनाकडून (पीएम केअर फंडातून) घाटी रुग्णालयाला पुरविलेल्या व्हेंटिलेटरचे उत्पादक गुजरातमधील राजकाेट येथील मे. ज्याेती सीएनसी ऑटाेमेशन कंपनीने एक आठवड्यात सविस्तर शपथपत्र दाखल करण्याचा आदेश मंगळवारी खंडपीठाने दिला. त्याचप्रमाणे लोकमतसह इतर दैनिकांतील बातम्यांवरून दाखल स्युमाेटाे जनहित याचिकेच्या सुनावणी वेळी म्युकरमायकाेसिसचे रुग्ण, त्याना दिले जाणारे अँफाेटेरेसिन-बी (लिपाेसाेमल) इंजेक्शन आदीबाबत २० जुलै रोजी सुनावणी होणार आहे. या प्रकरणात न्यायालयाचे मित्र ॲड. सत्यजीत बाेरा, असिस्टंट साॅलिसिटर जनरल ए. जी. तल्हार, मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे आदी काम पाहत आहेत.