औरंगाबाद : मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत १ डिसेंबर रोजी पदवीधर मतदासंघ निवडणुकीसाठी मतदान होत असून, मतदारांना काळजीपूर्वक पत्रिकेवर मत नोंदवावे लागेल. अंगठा छाप, सही, अद्याक्षरे किंवा कुठलीही चिन्ह, खूण करून केलेले मतदान बाद ठरेल. गेल्यावेळी १२ हजारांपेक्षा अधिक मते बाद ठरली होती.
आयोगाच्या सूचनेनुसार मतदान केंद्रावर मतपत्रिकेसोबत पुरविलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेनचाच वापर मतदारांना करावा लागेल. याशिवाय इतर कुठलेही पेन, पेन्सिल, बॉलपॉइंट पेनचा वापर करून केलेले मतदान अवैध ठरेल.
मतदारांना उमेदवाराच्या नावासमोरील पसंतीक्रम, असे नमूद केलेल्या रकान्यात ‘१’ हा अंक नमूद करून मतदान करावे. उमेदवारांची संख्या एकापेक्षा जास्त असली तरी ‘१’ हा अंक केवळ एकाच उमेदवाराच्या नावासमोर नमूद करावा. उर्वरित उमेदवारांच्या नावासमोर पसंतीक्रम २, ३, ४ इत्यादी अंक पसंतीक्रमानुसार स्तंभामध्ये दर्शवावा लागेल. कोणत्याही उमेदवारांच्या नावासमोर केवळ एकच अंक नमूद करणे गरजेचे आहे. तसेच एकच अंक एकापेक्षा जास्त उमेदवारांच्या नावासमोर नमूद करू नये.
अक्षरी मतदान करू नये
१, २, ३ याप्रमाणे पसंतीक्रम केवळ अंकात दर्शवावा. एक, दोन, तीन, इत्यादी शब्द मतपत्रिकेवर लिहू नये. अंक हे भारतीय आंतरराष्ट्रीय अंक स्वरूपात किंवा रोमन स्वरूपातील, संविधानाच्या ८ व्या अनुसूचीतील भारतीय भाषेतील अंकाच्या स्वरूपात नोंदविता येतील. मतपत्रिकेवर स्वाक्षरी, अद्याक्षरे, नाव कोणतेही शब्द नमूद करू नये. अंगठ्याचा ठसा उमटवू नये, अशी मतपत्रिका बाद ठरेल.