औरंगाबाद : गजबजलेल्या जळगाव टी पॉइंटजवळ भरदिवसा धाक दाखवून एका तरुणाला लुटल्याची घटना काल दुपारी घडली. विशेष म्हणजे मुकुंदवाडी पोलिसांनी या तरुणाची तक्रार घेण्यास पाच तास टाळाटाळ केली.पाथ्री तालुक्यातील जवळा येथील भास्कर बाळासाहेब पोळ (२४) हा युवक नोकरीनिमित्त औरंगाबादेत आला होता. काल सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास तो जळगाव टी पॉइंट येथील एका टपरीवर चहा पीत असताना चार अनोळखी व्यक्ती त्याच्याजवळ आल्या. या आरोपींनी भास्करला बाजूला ओढले आणि मारहाण करीत त्याच्या खिशातील रोख रक्कम व मोबाईल हिसकावून धमक्या देत आरोपींनी पलायन केले. या प्रकारानंतर भास्करने मुकुंदवाडी ठाणे गाठले, तेव्हा तेथील पोलिसांनी ‘तुला तुझे पैसे सांभाळता येत नाहीत का, आरोपींचे नाव, पत्ते सांग, नाही तर त्यांना शोध, ते दिसले तर आम्हाला सांग’ असे सांगून तक्रार नोंदविण्यास नकार दिला. ही बाब वरिष्ठांपर्यंत पोहोचल्यानंतर सायंकाळी त्याची तक्रार नोंदवून घेण्यात आली.
धाक दाखवून तरुणाला लुटले
By admin | Updated: August 22, 2014 00:21 IST