सेलू : तालुक्यात कोट्यवधी रुपयांना अनेकांना गंडा घालणाऱ्या सुपर पॉवरच्या तीन आरोपींना औरंगाबाद येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून, हे तिन्ही आरोपी जुने मोबाईल क्रमांक बंद करून नवीन नंबर घेऊन भूमीगत झाले असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे़सेलू तालुक्यात अधिक पैसे देण्याचे आमिष दाखवून सुपर पॉवर इन्व्हेंस्टमेंट कंपनीच्या वतीने अनेकांची फसवणूक करण्यात आली़ या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हाही दाखल झाला आहे़ या प्रकरणातील मुख्य आरोपी तथा कंपनीचा संचालक दीपक पारखे व दिव्या पारखे यांना पोलिसांनी अटक केली आहे़ सध्या हे दोन्ही आरोपी तुरूंगात हवा खात आहेत़या प्रकरणातील अन्य आरोपी व या कंपनीच्या संचालक मंडळातील कोअर कमिटीचे सभासद शिवाजी एकनाथ पौळ (५०), सतीश शिवाजी पौळ (२४, रा़ डिग्रस ता़ सेलू) व शेषराव लक्ष्मण घुले (४५, रा़ तुळतुंबा ता़ सेलू) हे जालना-मंठा रोडवरून नंबर नसलेल्या इंडिका कारमधून जात असल्याची माहिती औरंगाबाद येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली़त्यावरून मंगळवारी या तिन्ही आरोपींना सापळा रचून औरंगाबाद पोलिसांनी अटक केली़ त्यानंतर या आरोपीची चौकशी केल्यानंतर या आरोपींनी त्यांचे जुने मोबाईल बंद करून नवे मोबाईल नंबर मिळवून भूमीगत झाले असल्याचे समोर आले़ आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या कारला नंबर नसल्याने याचीही चौकशी पोलिसांकडून सुरू आहे़ या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे़ असे असले तरी गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळणे आवश्यक आहे़ त्या दृष्टीकोनातून पोलिसांनी तपास करावा, अशी अपेक्षा गुंतवणूकदारांमधून व्यक्त केली जात आहे़ (प्रतिनिधी)
‘सुपर पॉवर’चा गंडा घालणाऱ्या तिघांना अटक
By admin | Updated: August 27, 2014 23:37 IST