वसमत: शहरातील मुख्य बाजारपेठेतील रहदारीची समस्या दिवसेंदिवस जटील होवून बसली आहे. अस्ताव्यस्त हातगाडेवाल्यांचे बस्तान व बाजारपेठेत अवैध वाहतूक करणार्या वाहनांचे तळ यामुळे वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजत असल्याचे चित्र आहे. वसमत शहराच्या मुख्य बाजारपेठेतून पादचार्यांनाही रस्ता शोधावा लागत आहे. दुकानांसमोर आडव्या-तिडव्या लावलेल्या दुचाकी, हातगाड्यांनी व्यापलेला रस्ता, व्यापार्यांनी दुकानाबाहेर लावलेल्या सामानांच्या उतरंडी यामुळे बाजारपेठेतील रस्ता रहदारीलाही शिल्लक राहत नाही. आॅटोवाल्यांची बाजारपेठेतून वाढलेली गर्दी या समस्येत भर टाकत आहे. शहराची रहदारी दिवसातून किमान दहा वेळा तरी ठप्प होते. ही रहदारी सुरळीत करण्यासाठी मात्र कधी वाहतूक नियंत्रक पोलिस आलेले वसमतकरांनी कधी पाहिले नाही. पोलिस ठाण्याजवळच रहदारी ठप्प होण्याच्या घटनाही आता दिवसातून अनेकदा होत आहेत. पोलिस ठाण्याजवळही वाहतूक ठप्प होत असेल व पोलिस रहदारी सुरळीत करण्यासाठी बाहेर येत असतील तर शहरातील अन्य भागातील तुंबलेल्या रहदारीची काय अवस्था होत असेल? याची कल्पना न केलेलीच बरी. पोलिस ठाण्याच्या समोर व महावीर चौकात रस्त्याच्या दुतर्फा हातगाडेवाले, साहित्य विक्रेत्यांनी दुकाने थाटून रस्ता व्यापला आहे. या रस्त्यावरून आॅटो, टेम्पो, ट्रक, जीप आदी वाहने शहरात दाखल होत असतात. अशा वाहनांमुळे अनेकदा रहदारी ठप्प होते. पोलिस ठाणे ते झेंडा चौक, झेंडा चौक ते मामा चौक, मामा चौक ते जुना मोंढा, जुनी न. प. ते मामा चौक व महावीर चौक ते जुनी न.प. या शहरातील मुख्य बाजारपेठेतून दुचाकीवरून जाणे-येणेही अवघड झाले आहे. वाढलेले अतिक्रमण, आॅटोरिक्षांची गर्दी, शहरात पार्किंगची व्यवस्था नसणे, दुकानांसमोर लावलेल्या सामानांच्या उतरंडी व अवैध वाहतूक करणार्या वाहनांची गर्दी, यामुळे रहदारीची समस्या वसमतकरांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पोलिस प्रशासनाने रहदारीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केलेला नाही. नगरपालिका प्रशासनाला या समस्येची दखल घेण्यास वेळ नाही. पदाधिकारी, अधिकारी यांची या बिन फायद्याच्या कामात वेळ वाया घालवण्याची तयारी नाही. समस्येने त्रस्त नागरिक जागेवरच राग व्यक्त करत गप्प बसतात. राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडे एखाद्या सामाजिक समस्येविरोधात आंदोलन उभी करण्यासाठी लागणारी शक्ती व कार्यकर्त्यांची फौज नाही. लेटरपॅडपुरते पदाधिकारी वाढल्याने ही समस्या सोडवावी कोणी? हा प्रश्नच आहे. पोलिसांचा धाक उरलेला नाही. पोलिस अधिकारी कायद्याचा बडगा उगारण्याऐवजी फायद्याची व्याख्या व व्याप्ती समजावून सांगण्याचेच काम करत असल्याने पोलिसांची भिती रहदारीची नियम तोडणार्यांना राहिलेली नाही. जुना मोंढा, बसस्थानक, कारखाना रोड, मोठा मारोती मंदिर, पंचायत समिती कॉर्नर, नगरपालिका परिसर आदी भागात अवैध वाहतुकीच्या वाहनांची गर्दी नेहमी असते. राष्टÑीय महामार्गावरही या वाहनांमुळे रहदारी ठप्प होत असते; परंतु वाहतूक नियंत्रणासाठी तत्पर असलेले पोलिसांचे पथक याकडे लक्ष देत नाही. आता तर टपावर प्रवासी घेवून खासगी वाहने शहरातूनही धावत आहेत, हे प्रकार गेल्या सहा महिन्यांत अचानक का वाढले, याचा अर्थही समजण्यास मार्ग नाही. बाजारपेठेतील रहदारीच्या समस्येने शहरातील शांतता भंग होण्याचा धोका निर्माण झाला आहे. रहदारी ठप्प झाल्याने अनेकदा हाणामार्या होण्याचेही प्रसंग घडले आहेत. असे असले तरी रस्त्यावरील उभे टेम्पो, आॅटोरिक्षा, जीप व दुकानांसमोरील दुचाकींची गर्दी हटवण्यासाठी कोणतीही यंत्रणा पुढे येताना दिसत नाही, हे विशेष. (वार्ताहर) यंत्रणा बेफिकीर वसमतमध्ये दुकानांसमोर लावलेल्या दुचाकी, हातगाड्यांनी व्यापलेला रस्ता, व्यापार्यांनी दुकानाबाहेर लावलेल्या साहित्याच्या उतरंडीमुळे बाजारपेठेतील रस्ता झाला ब्लॉक बाजारपेठेत अवैध वाहतूक करणार्या वाहनांचे तळ यामुळे रहदारी व्यवस्थेचे वाजले तीनतेरा पोलिस ठाण्यासमोर व महावीर चौकात रस्त्याच्या दुतर्फा हातगाडेवाले, इतर विक्रेत्यांनी दुकाने थाटून रस्ता व्यापला वाढलेले अतिक्रमण, आॅटोंची गर्दी, शहरात पार्र्किंगची व्यवस्था नसणे, दुकानांसमोर लावलेल्या सामानाच्या उतरंडी व अवैध वाहतूक करणार्या वाहनांची गर्दी, यामुळे रहदारीची समस्या वसमतकरांसाठी डोकेदुखी झाली शहराची रहदारी दिवसातून किमान दहा वेळा तरी ठप्प होते. ही रहदारी सुरळीत करण्यासाठी मात्र कधी वाहतूक नियंत्रक पोलिस आलेले वसमतकरांनी कधी पाहिले नाही. रहदारीची समस्या सोडविण्यासाठी आता कोण पुढाकार घेईल? हाच खरा प्रश्न आहे.
वसमतमधील वाहतुकीचे तीनतेरा
By admin | Updated: May 12, 2014 00:02 IST