वैजापूर : बांधकाम साहित्याची वाहतूक करताना नियमांची पायमल्ली केल्यामुळे परिवहन विभागाने वैजापुरात तीन वाहनांवर कारवाई करीत तीन लाख २३ हजार ७०० रुपयांचा दंड ठोठावला. अवजड वाहनातून बेसुमार बांधकाम साहित्याची वाहतूक, वाहनांची कागदपत्रे नसणे या कारणांमुळे दंड करण्यात आला.
सध्या समृद्धी महामार्गाचे काम सुरू असून या कामासाठी लागणाऱ्या माती, मुरूम, खडीसह इतर बांधकाम साहित्याची औरंगाबाद रस्त्यावरील खदानीतून हायवाद्वारे विविध ठिकाणी वाहतूक केली जाते. मात्र वाहतूक करताना नियमांचे पालन होत नसल्याने अतिरिक्त वाहतुकीमुळे रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. आरटीओ विभागाच्या वतीने या वाहनांची तपासणी केली. यावेळी नवनाथ कसाने व ओम दाक्षायणी स्टोन क्रशरला वाहनातून अतिरिक्त वाहतूक केल्याबद्दल प्रत्येकी १ लाख २२ हजार ७५० रुपये व रियाज शेख यांना कागदपत्रे नसल्याबद्दल ७८ हजार २०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. प्रादेशिक परिवहन विभागाचे महेश काळे व फेरोज शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.