जालना : राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (एन.यू.एच.एम.) अंतर्गत जालना नगरपालिकेला शहरात पाणीवेस, रामनगर आणि नूतन वसाहत या भागात तीन नागरी दवाखान्यांना मंजुरी देण्यात आली आहे. पालिकेने यात दोन जुन्या दवाखान्यांचा समावेश केला आहे. त्यामुळे नवीन यंत्रणा उपलब्ध होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. शहरात पाणीवेस व रामनगर या भागात नगरपालिकेचे दवाखाने आहेत. पाणीवेस येथील आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीच्या बांधकामामुळे हा दवाखाना सध्या नगरपालिकेच्या जुन्या इमारतीत सुरू आहे. मात्र दोन्ही दवाखान्यांसाठी एक एमबीबीएस आणि एक बीएएमएस वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. शिवाय अन्य स्टाफही अपुरा आहे. औषधसामग्रीही अपूर्णच आहे. त्यामुळे शहरातील बहुसंख्य रुग्णांना अन्य दवाखान्यांमध्ये उपचारासाठी जावे लागते. विशेष म्हणजे दररोज या दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी असते. परंतु तेथील स्टाफ कमी असल्याने सुविधांचा अभाव होतो.केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानअंतर्गत शहरात नवीन तीन दवाखान्यांना मंजुरी मिळावी, यासाठी पालिकेने गेल्या एक वर्षापासून संबंधितांकडे पाठपुरावा सुरू केला होता. या पाठपुराव्याला यश मिळाले व तीन दवाखान्यांना मंजुरी देण्यात आली. मात्र या दवाखान्यांचे ठिकाण पालिकेनेच निश्चित करावे, अशी सूचना ‘एनयूएचएम’ ने केली होती. त्यानुसार पालिकेचे जुने पाणीवेस व रामनगर या दवाखान्यांसह नूतन वसाहत भागात नवीन दवाखाना सुरू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपूर्वीच तीन नागरी दवाखान्यांना मंजुरी मिळाल्याची माहिती महिला वैद्यकीय अधिकारी जे.एम. डेकोवाडिया यांनी दिली. तीन दवाखान्यांसाठी प्रत्येकी २ असे ६ एमबीबीएस डॉक्टर असणार असून अन्य स्टाफची भरती वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार लवकरच केली जाणार असल्याचे डेकोवाडिया यांनी सांगितले. या दवाखान्यांमध्ये कर्मचारी भरती प्रक्रियेची पूर्वतयारी सध्या सुरू आहे. मात्र येत्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागणार असल्याने ही प्रक्रिया लांबणीवर पडते की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)या योजनेनुसार वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक थेट एनयूएचएम मार्फत केली जाते. शिवाय परिचारिका, फार्मासिस्ट, लॅबटेक्नीशिएन या पदांची भरती नगरपालिकेला करावी लागणार आहे. औषधसामग्री व इतर सुविधा एनयूएचएम मार्फत पुरविल्या जातात. ४५० हजार लोकसंख्येला एक दवाखाना असणे आवश्यक आहे. शहरातील लोकसंख्या तीन लाखांच्या जवळपास आहे. त्यामुळे सहा दवाखान्यांची गरज आहे. त्यासाठी नगरपालिकेने पाणीवेस, रामनगर यासह नूतन वसाहत, चंदनझिरा, शास्त्री मोहल्ला, मूर्गी तलाव या दवाखान्यांची शिफारस केली होती. परंतु एनयूएचएमने यातील तीन दवाखान्यांनाच मंजुरी दिली.सध्या नगरपालिकेच्या दोन दवाखान्यात प्रत्येकी एक वैद्यकीय अधिकारी आहे. त्यामध्ये एक एमबीबीएस तर एक बीएएमस आहेत. रुग्णांची संख्या लक्षात घेता या डॉक्टरांची संख्या कमी आहे. शिवाय आॅपरेटर एकच आहे. त्यामुळे काही कामे स्वत: डॉक्टरांनाच करावी लागतात.
नगरपालिकेच्या तीन दवाखान्यांना मंजुरी
By admin | Updated: August 22, 2014 00:57 IST