उस्मानाबाद : कंटेनर आणि टमटमच्या भीषण अपघातात तिघे जण ठार तर सहाजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. ही घटना गुरूवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव सिद्धेश्वर (ता. उस्मानाबाद) नजीक घडली. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असून, त्यांना सोलापूर येथील रुग्णालयात हलविण्यात आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, औरंगाबाद-सोलापूर मार्गावरून भरधाव वेगातील कंटेनर (एमएच. ४६- एच. ७८७८) तुळजापूरकडे निघाला होता. तर प्रवासी वाहतूक करणारे टमटम (एम.एच. २५/एफ.१५७७) प्रवासी घेवून तुळजापूरहून उस्मानाबादकडे येत होते. ही दोन्ही वाहने वडगाव (सि) नजीक आली असता भरधाव वेगातील कंटेनरने टमटमला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात टमटमधील चंद्रकला सिद्धलिंग केवटे (वय-४८, रा. ढेकरी) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर आनिता मुरली मार्तंड (वय-५०, रा. बामणीवाडी) व टमटमचालक उद्देश भाऊसाहेब राठोड (वय-२८, रा. दीपक तांडा) या दोघांना उपचारासाठी येथील जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. या अपघातात बंडू आगातराव खंडागळे (वय-३८, रा. जुनोनी), अर्चना नानासाहेब सिरसट (वय-३५, रा. बोरी), सुभाष हरी बनसोडे (वय-३५, रा. लासोना), ज्योती नाना सिरसट (वय-१७, रा. बोरी), सुवर्णा पोपट लगदिवे (वय-५०, रा. शेकापूर) आणि निर्मला शिवाजी लगदिवे (वय-५०, रा. शेकापूर) हे सहाजणही जखमी झाले. यापैकी ज्योती सिरसट व सुवर्णा लगदिवे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयामध्ये प्रथमोपचार करून त्यांना तातडीने सोलापूर येथे हलविण्यात आले. या भीषण अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजुने वाहनांची लांबलचक रांग लागली होती. जखमींना रूग्णालयात हलविल्यांनतर क्रेनच्या साह्याने कंटेनर रस्त्यावरून हटविण्यात आला. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. घटनास्थळी डीवायएसपी मोहन विधाते, पोउपनि सूर्यवंशी, राठोड आदी दाखल झाले होते. (प्रतिनिधी) तुळजापूर : सोलापूर-धुळे महामार्गावरील माळुंब्रा गावानजीक टँकर आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात दोन युवक जागीच ठार झाले. ही घटना गुरूवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.तुळजापूर तालुक्यातील दहीवडी येथील सुखदेव राघु गायकवाड (वय-२०) आणि नितीन तानाजी गायकवाड (वय-१५) हे दोघेही दुचाकीवरून (क्र. एमएच. २५- एक्स. ५५६०) तुळजापूरकडे निघाले होते. यांची दुचाकी माळुंब्रा गावानजीक असलेल्या नागोबा मंदिराजवळ आली असता पाठीमागून येणाऱ्या टँकरने (क्र. एमएच.२४-जे.८४३२) दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दोघेही जागीच ठार झाले. या प्रकरणी बळी रामू गायकवाड (रा. दहीवाडी) यांच्या फिर्यादीवरून टँकर चालकाविरूद्ध तुळजापूर ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. (वार्ताहर)
वडगावजवळ अपघातात तिघे ठार
By admin | Updated: April 3, 2015 00:39 IST