जालना/अंबड : अंबड तालुक्यातील पिंपरखेड शिवारात १२ नोव्हेंबर रोजी दत्ता बाबूराव पारवे यांना दारू पिण्याच्या कारणावरून मारहाण करून त्यांना जीवे मारल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या तिन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता २३ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.अंबड तालुक्यातील चिंचखेड गावात दारूबंदी असल्याने त्या गावातील दत्ता बाबूराव पारवे हा पिंपरखेड येथे १२ नोव्हेंबर रोजी दारू पिण्याच्या गेला होता. तेथे एका दारू विक्रेत्या महिलेच्या घरी दारू पिल्यानंतर जास्त नशा झाल्याने तो त्या महिलेच्या घराजवळ जमिनीवर पडला होता. रात्री ११ वाजेच्या सुमारास गावातील सखाराम शेषराव वनारसे , संदीप देवराव राजंणे, राहुल धोंडीबा नागरे हे दारू पिण्यासाठी आले होते.दारू पिल्यानंतर त्यांना गावातीलच दत्ता पारवे हा तेथे नशेत पडलेला दिसला. त्यास त्या तिघांनी गावाकडे येण्यासाठी त्यास उठविले तेव्हा त्यांच्यात शिवीगाळ होवून भांडण झाले. त्यानंतर त्या तिघांनी त्यास मोटारसायकलवर बसवून गावाकडे घेऊन जात असताना रस्त्यात पुन्हा भांडण झाले. त्यात जबर मारहाणीमुळे पारवे यांचा मृत्यू झाल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने अंबड पोलिसांनी त्या तिघांवर खूनाचा गुन्हा दाखल करून मंगळवारी अटक केली होती. बुधवारी या तिघांनाही अंबड येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २३ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक रामेश्वर खणाळ यांनी दिली. (वार्ताहर)
चिंचखेड खून प्रकरणातील तीन आरोपींची पोलिस कोठडीत रवानगी
By admin | Updated: November 19, 2015 00:20 IST