परळी: शहरातील इंदिरानगर येथील एका २४ वर्षीय युवकाने धमक्यांना घाबरुन विषारी द्रव पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावसाहेब किसन राठोड, ताराबाई बबन चव्हाण व भुराबाई रावसाहेब राठोड अशी त्या आरोपींची नावे आहेत. सपोनि दराडे म्हणाले, संजय धोंडीराम राठोड याचे व भुराबाई यांचे प्रेमसंबंध असल्याचा संशय रावसाहेब राठोड यास होता. काही दिवसांपूर्वी ताराबाई चव्हाण व भुराबाई राठोड या परळी येथे आल्या होत्या. त्यावेळी संजय राठोडही लेंडेवाडी येथून आला होता. त्यांना एकत्र पाहून रावसाहेब राठोड याने त्यांच्या प्रेमसंबंधाचा संशय दाखवून संजय राठोड यास मारहाण करुन धाक दाखविला. तसेच त्यास जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. यामुळे संजय घाबरुन गेला व त्याने विषारी द्रव प्राशन केले. त्याच्या घराच्या मंडळीस ही बाब कळाल्याने त्यांनी उपचारासाठी त्यास दवाखान्यात घेऊन गेले. उपचारादरम्यान, त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी राजाभाऊ धोंडीराम राठोड यांच्या फिर्यादीवरुन तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीतील दोन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. तपास सपोनि दराडे करीत आहेत. (वार्ताहर)
धमक्यांना घाबरुन युवकाची आत्महत्या
By admin | Updated: June 25, 2014 01:04 IST