उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्याला कोणताही मोठा कार्यक्रम द्यायचा म्हटलं की, तो यशस्वी होतो की नाही, असा प्रश्न मुंबई, पुण्याचे लोक उपस्थित करतात़ मात्र, श्री तुळजाभवानी, श्री संत गोरोबाकाकांच्या भूमीत होणारे नाट्य संमेलन यशस्वी करण्याची धमक येथील भूमिपूत्रांमध्ये आहे़ ‘माझं गाव, माझं संमेलन’ याप्रमाणे नाट्य महोत्सव आणि नाट्य संमेलन हे नक्कीच यशस्वी होणार असल्याचा विश्वास आ़ मधुकरराव चव्हाण यांनी व्यक्त केला़९७ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनानिमित्त आयोजित नाट्य महोत्सवाचे रविवारी सायंकाळी दिमाखदार सोहळ्यात उद्घाटन करण्यात आले़ यानिमित्त आयोजित कार्यक्रमात आ़ चव्हाण बोलत होते़ कार्यक्रमास खा़ रवींद्र गायकवाड, संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा आमदार सुजितसिंह ठाकूर, ज्येष्ठ रंगकर्मी श्रीकांत नाडापुडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, प्रमुख कार्यवाहक दीपक करंजीकर, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, कळंबच्या नगरध्यक्षा सुवर्णा मुंडे, उपनगराध्यक्ष सुरज साळुंके, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल खोचरे, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, निमंत्रक धनंजय शिंगाडे, रहेमान काझी, शाखाध्यक्ष विशाल शिंगाडे आदी उपस्थित होते़ प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले़ शाखाध्यक्ष विशाल शिंगाडे यांनी प्रास्ताविक केले़ यावेळी बोलताना स्वागताध्यक्ष आ़ ठाकूर म्हणाले, सर्वांच्या प्रयत्नातून उस्मानाबादेत होणारे ९७ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन ऐतिहासिक करण्याचा संकल्प केला आहे़ आजवरची संमेलने तीन दिवसांची होत होती़ मात्र, नाट्य संमेलनापूर्वी नाट्य महोत्सवाचे आयोजन करून हे संमेलन आठ दिवसांचे केले आहे़ आजवरच्या नाट्य संमेलनाचे ‘संमेलन गित’ तयार करण्यात आले नव्हते़ यंदा प्रथमच उस्मानाबादच्या संमेलनाचे ‘संमेलन गित’ तयार करण्यात आले असून, ही परंपरा पुढे कायम राहणार आहे़ जिल्ह्यात अनेक कलाकार आहेत, त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महोत्सवरूपी एक व्यासपीठ उभा राहिले आहे़ यादरम्यान, गाजलेली सात नाटके, तीन लोककला, विविध एकांकिका आदी कार्यक्रमांची मेजवानी उस्मानाबाद जिल्ह्यातील रसिकांना मिळणार आहे़ संमेलन यशस्वी करून राज्यासमोर एक आदर्श ठेवण्याचे प्रयत्न आमच्या सर्व समित्यांचे सदस्य करीत असल्याचेही आ़ ठाकूर यावेळी म्हणाले़खा़ रवींद्र गायकवाड यांनी आपल्या शैलीत भाषणाला सुरूवात केली़ उस्मानाबादला कार्यक्रम द्यायचे म्हटलं तर ‘विमान’ नाही असा विचार केला जातो, असे ते म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हश्या पिकला़ क्षेत्र कोणतेही असो उस्मानाबादला कार्यक्रम द्यायाचा म्हटलं की तारखा मिळत नाहीत, ही शोकांतिका आहे़ मात्र, मोठ्या प्रयत्नातून उस्मानाबादला ९७ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आयोजनाची संधी मिळाली आहे़ संमेलनात आज असणाऱ्या उणिवा उद्या दुरूस्त करून ते यशस्वी करण्यात येईल, असेही ते म्हणाले़ पुढे बोलताना आ़ चव्हाण म्हणाले, जिल्ह्यात झालेले आजवरचे सर्वच कार्यक्रम यशस्वी झाले आहेत़ ९७ वे नाट्य संमेलनही राजकारण विरहित सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने यशस्वी होईल़ यापुढील काळात जिल्ह्यात कुस्तीगिर परिषद घेणे गरजेचे असून, विविध क्षेत्रातील गुणवंतांसाठी निधी उभा करून त्यांना मदत करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहनही आ़ चव्हाण यांनी केले़ कार्यकमास शहरासह परिसरातील नाट्यप्रेमी नागरिक उपस्थित हाते़ (प्रतिनिधी)
संमेलन यशस्वी करण्याची संतांच्या भूमीत धमक
By admin | Updated: April 16, 2017 23:20 IST