उस्मानाबाद : एकीकडे सर्वसामान्य ग्राहकांना रांगा लावूनही वेळेवर गॅस सिलिंडर उपलब्ध होत नसतानाच दुसरीकडे व्यावसायिक मात्र सर्रास घरगुती गॅसचा वापर करीत असल्याचा प्रकार ‘लोकमत’ ने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून उजेडात आणला होता. याचीच दखल घेत, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या आदेशानुसार जिल्हाभरात शनिवारी एकाचवेळी हॉटेल, ढाब्यांची अचानक तपासणी केली. या तपासणीमध्ये सर्वाधिक काळाबाजार उस्मानाबाद शहर व परिसरात आढळून आला. त्या खालोखाल उमरग्याचा क्रमांक लागला. जिल्हाभरात मिळून सुमारे दोनशे सिलिंडर जप्त करण्यात आले. आता संबंधित व्यावसायिकांविरुद्ध प्रशासनाने कठोर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला आहे.उस्मानाबाद शहरासह परिसरामध्ये गॅसचा सर्रास काळाबाजार होत असतानाही पुरवठा विभागाकडून याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात होती. विशेष म्हणजे शासकीय कार्यालयाच्या आवारात सुरु असणारे हॉटेल्स आणि चहाच्या गाड्यांवरही पुरवठा विभागाच्या आशीर्वादाने घरगुती गॅस सिलिंडरउपयोगात आणले जात होते. शहरातील मोक्याच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी असलेले हॉटेल्सही याला अपवाद नव्हते. शहराच्या बाहेर असलेले ढाबेचालक तर सर्रास घरगुती गॅसच उपयोगात आणत असत. हा सर्व प्रकार ‘लोकमत’ने स्टींग आॅपरेशनच्या माध्यमातून उजेडात आणला होता. त्याचप्रमाणे सर्वसामान्यांच्या तक्रारीही जिल्हा व तालुका प्रशासनाकडे येत होत्या. याची दखल घेत, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी जिल्हाभरात एकाच दिवशी हॉटेल, ढाबे, चहाचे गाडे तपासणीचे आदेश दिले होते. त्यानुसार त्या-त्या तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शनिवारी व्यावसायिकांची झाडाझडती घेतली. या कारवाईमध्ये तब्बल दोनशेच्या आसपास घरगुती गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, जप्त केलेल्या सिलिंडरची संख्या वाढू शकते, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे ही कारवाई रात्री उशिरापर्यंत जिल्ह्याच्या विविध भागात सुरु होती.घरगुती १०४ सिलिंडर जप्तउस्मानाबाद शहर व पसिरात महसूल विभागाच्या वतीने हॉटेल व धाब्यावर धाडी टाकून अवैधरित्या वापरण्यात येणाऱ्या घरगुती सिलिंडरच्या १०४ टाक्या जप्त केल्या. असल्याची माहिती नायब तहसीलदार राजेश जाधव यांनी दिली. शिवाजी चौक, बसस्थानक परिसर, बार्शी नाका , तुळजापूर रोड, लातूर बायपास रोड, हातलादेवी परीसर, बेंबळी, ढोकी, येडशी, तेर ठिकाणच्या कारवाईत घरगुती गॅस जप्त करण्यात आले आहेत.१२ सिलिंडर हस्तगतवाशी शहर व परिसरातील हॉटेल, चहाचे गाडे, ढाबे आदी ठिकाणी महसूल विभागाच्या पथकांनी छापे मारले. कारवाईदरम्यान जवळपास १२ घरगुती गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, काही व्यवसायिकांना कारवाईची कुणकुण लागताच त्यांनी दुकाने बंद केली. तर काहीजणांनी गॅस सिलिंडर काढून स्टोव्ह सुरू केला. तर काहींनी व्यवसायिक टाक्या जोडल्या. सदरील पथकामध्ये नायब तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे, बी. डी. कसबे, मंडळ अधिकारी खुळे, पवार आदींचा समावेश होता.कारवाईत सातत्य हवेमागील काही वर्षांपासून अशा स्वरुपाची कारवाई झालेली नव्हती. त्यामुळे चौका-चौकातील व्यावसायिकांकडे घरगुती वापराचे सिलिंडर दिसून येत होते.असे हॉटेल्स आणि ढाबे पाहिल्यानंतर यांच्यावर कोणाचा वचक आहे की नाही असा प्रश्न पडत होता. दरम्यान, या कारवाईने अवैधरीत्या घरगुती गॅस वापरावर काही प्रमाणात का होईना अंकुश येणार असला तरी या कारवाईमध्ये सातत्य ठेवण्याची गरज सर्वसामान्य ग्राहकांमध्ये व्यक्त केली जात आहे. (ठिकठिकाणच्या वार्ताहरांकडून)४१ दुकानांची अचानक तपासणीभूम : महसूल विभागाच्या वतीने भूम शहर व परिसरातील जवळपास ४१ दुकानांची अचानक तपासणी केली. यापैकी १२ व्यवसायिक घरगुती गॅसचा वापर करीत असल्याचे आढळून आले. पथकामध्ये पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार डी. एस. मोहिते, एस. डी. कुलकर्णी, व्ही. डी. केवळीकर, पी. पी. ईनामदार, अव्वल कारकून टी. एस. गलांडे, हरिश्चंद्र पवार, एस. जी. कवडे, तलाठी यू. एन. देशपांडे, थोरात, पोलिस कर्मचारी गणेश पाटील आदींचा समावेश होता.१०८ व्यवसायिकांचा पंचनामाकळंब : महसूल विभागाच्या पथकाने शहरासह ग्रामीण भागातील १०८ दुकानांची अचानक तपासणी केली. यामध्ये १२ व्यवसायिक अनधिक्रतरित्या घरगुती गॅसचा वापर करताना आढळून आले. यामध्ये कळंब ४, येरमाळा ३, मोहा १, शिराढोण ३, ईटकूर येथील एका व्यवसायिकाचा समावेश आहे. ही कारवाई तहसीलदार वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार पी. पी. आवाड, अव्वल कारकून बी. बी. बिक्कड, मंडळ अधिकारी डी. डी. कदम, नायब तहसीलदार डी. एम. शिंदे, तलाठी नागटिळक, तलाठी कावळे यांचा समावेश आहे. २५ गॅस सिलिंडर जप्तउमरगा : उमरगा तालुक्यातही दुकानांची अचानक तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान २५ घरगुती गॅस सिलिंडर व्यवसायासाठी वापरण्यात आल्याचे दिसून आले. हे सर्व सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. संबंधितांविरूद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे उपविभागीय अधिकारी रवींंद्र गुरव व तहसीलदार उत्तमराव सबनीस यांनी सांगितले. बैठकीत सर्व हॉटेल व्यवसायिकांनाही लेखी सूचना देण्यात आल्या होत्या. या कारवाईमुळे व्यवसायासाठी घरगुती गॅस वापरणारांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, प्रशासन आता संबंधित व्यवसायिकांविरूद्ध काय कारवाई करते याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागून आहे.स्टोव्ह आले बाहेरमहसूल विभागाची पथके हॉटेल्स, ढाब्यांची झाडाझडती घेत असल्याची कुणकुण व्यावसायिकांना लागताच अनेकांनी दुकाने बंद केली. काही जणांनी अडगळीला पडलेला स्टोव्ह बाहेर काढला. तर काही जणांनी व्यावसायिक सिलिंडर जोडला. त्यामुळे काही तालुक्यामध्ये जप्त केलेल्या सिलिंडरची संख्या कमी असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हाभरात धाडसत्र !
By admin | Updated: July 13, 2014 00:19 IST