लोकमत न्यूज नेटवर्कफुलंब्री : तालुक्यातील निधोना येथील ग्रामस्थांनी राजकीय मतभेद बाजूला ठेऊन एकत्र येत गाव ‘पाणीदार’ करण्यासाठी कंबर कसली आहे. शासनाच्या मदतीविना आपले गाव पाणीदार करण्याची त्यांनी प्रतिज्ञा घेतली व लोकसहभागातून नदी, नाला खोलीकरण कामाला सुरुवात केली. गेल्या दीड महिन्यात आठ कि. मी. लांबीचे काम पूर्णही झाले आहे.फुलंब्री तालुक्यात शेवटच्या टोकाला असलेल्या निधोना गावाची लोकसंख्या ३३०० आहे. या गावाचे भौगोलिक क्षेत्र १२ हजार हेक्टर आहे. यातील ८० टक्के जमीन जिरायत तर केवळ २० टक्केच जमीन हंगामी बागायत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सतत पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने शेतकºयांना शेती करणे अवघड झाले आहे. पावसाळ्यात फार कमी पाऊस पडल्याने गावानजीकच्या पाझर तलावात पाणीसाठा झालाच नाही. विहिरींचे पाणी आटले. परिणामी गेल्या चार महिन्यांपासून म्हणजे नोव्हेंबर २०१७ पासून गावातीन नागरिकांना टँकरने पिण्याचे पाणी दिले जात आहे.मशीनरीला लागणारे इंधन लोकवर्गणी करून करण्यात येत आहे. यात गावाचे पण बाहेरगावी नोकरीला असणाºया लोकांची आर्थिक मदत होत आहे, आतापर्यंत आठ लाखाचा खर्च हा इंधनावर झाला आहे.गाव परिसरातील नद्या, नाल्यांचे खोलीकरण, रुंदीकरण केल्यानंतर गावाने वाटरकप स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अधिक एकजुटीने व परिश्रम घेऊन गाव संपूर्ण पाणीदार करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी घेतला आहे. ‘लोकमत’ सरपंच अवॉर्ड विजेते संतोष जोशी (गोळेगाव) यांनी नुकतेच निधोना येथे येऊन वॉटरकप व जलसंधारण विषयावर ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.राजकीय मतभेद बाजूला सारून ग्रामस्थांनी केली प्रतिज्ञागाव परिसरात असलेल्या नदी व नाल्याचे रुंदीकरण, खोलीकरण करून पाणी अडविले गेले तर येणाºया काळात पाणीसाठवण करता येईल व त्यामुळे पाणीटंचाई निवारणास मदत होईल, असा विचार करून ग्रामस्थांनी २६ डिसेंबर रोजी स्थानिक राजकीय हेवेदावे, गटतट विसरून एकत्र आले.लोकांची एकजूट करून आपल्या गावासाठी आपणच काहीतरी करायचे हा निश्चय केला व लोकसहभागातून जलसंधारणची कामे हाती घेण्याचा हा निर्णय घेतला. वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणांनी पुढाकार घेतला. गेल्या दीड महिन्यांपासून दोन जेसीबीने रात्रंदिवस काम सुरु आहे.यात आतापर्यंत सुमारे आठ कि.मी. लांबीचे रुंदीकरण व खोलीकरण करण्याचे काम पूर्ण केले आहे. हे काम येणाºया काळात सुरूच राहणार आहे.
गाव ‘पाणीदार’ करण्यासाठी एकवटले ग्रामस्थांचे हजारो हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 00:39 IST