रमेश शिंदे, औसा मागील पाच-सहा वर्षांपासून पावसाचे कमी होत असलेले प्रमाण, अवेळी पडणारा पाऊस, परिणामी शेतकर्यांचे होणारे मोठे नुकसान यामुळे शेती व्यवसायच पूर्णपणे कोलमडून पडला आहे़ निसर्गाच्या लहरी फटक्याने नको ती शेती असे म्हणण्याची अवस्था आता शेतकर्यांची झाली आहे़ एकीकडे चार्याची टंचाई तर दुसरीकडे सालगडी व रोजंदाराची गंभीर बनत चाललेली समस्या यामुळे औसा तालुक्यातील हजारो शेतकर्यांवर बैल -बारदाना मोडण्याची वेळ आली आहे़ औसा तालुक्यात १ लाख २० हजार ७२० हेक्टर शेतीचे क्षेत्र आहे़ बहुतांश शेती ही पाण्यावर अवलंबून आहे़ सिंचनाचे क्षेत्रही अत्यल्प असल्यामुळे पावसाळीवरच शेती अवलंबून आहे़ आठ-दहा एकर शेती असणारा शेतकरी दोन बैल, एखाद दुसरे दुधाचे जनावर सांभाळतो़ परंतु, मागील चार-पाच वर्षांपासून शेतीमध्ये उत्पन्न कमी आणि खर्च अधिक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे़ या अवस्थेमुळे शेती व्यवसायच पूर्णपणे कोलमडला असून, शेतकरी राजा कंगाल झाला आहे़ शेतीमध्ये सालगडी मिळेनात, हंगामात मजूर मिळेनात़ यामुळे अल्पभूधारक शेतकरी आता आपली शेती वाट्याने किंवा पैशाने दुसर्याकडे वर्षभरासाठी लावून देत आहे़ औसा तालुक्यात सव्वा ते दीड लाखाच्या जवळपास पशुधन आहे़ यामध्ये ५६ हजार बैलजोड्या आहेत़ शेतकर्यांकडे दोन ते चार बैल तर लहान शेतकर्यांकडे दोन बैल, असे साधारण चित्र ग्रामीण भागात पहायला मिळत आहे़ म्हणून आता लहान शेतकरी नको ती झंझट म्हणून आपला बारदाना मोडीत काढीत आहे़ यावर्षी तर अवकाळी पावसाने कहरच केला आहे़ रबी हंगामातील बहुतांश पिके ही गारपिटीमुळे हातची गेली़ कडबा काळा पडला़ त्यामुळे आता जनावरांना सांभाळायचे कसे, असा प्रश्न शेतकर्यांना सतावतो आहे़ चांगली बैलजोडी, औजारे करायचे म्हटले की, किमान लाख-दीड लाख रुपये खर्च येतो़ एवढा खर्च करून केलेला हा बारदाना शेतकरी जड अंतकरणाने मोडीत काढत आहेत़ आमच्यापेक्षा रोजंदार बरे़़़ यासंदर्भात बोलताना शेतकरी लिंबराज जाधव म्हणाले, पाच वर्षांपासून शेती नुकसानीत आहे़ हे वर्ष गेले, आता पुढील वर्ष तरी चांगले राहील म्हणून पाच वर्षे काढली़ पण; खर्च अधिक आणि उत्पन्न कमी, अशी परिस्थिती झाली़ आमच्याकडे माल असला की भाव कमी आणि आम्ही घ्यायला गेलो की, भाव जास्त असे होत आहे़ आमच्यापेक्षा रोजंदारी करणारे बरे़ दिवसभर काम केले की, २०० रूपये मिळतात़ परिणामी, १ लाख ४० हजार रूपयांचा बैल-बारदाना एक लाखात विकला आणि शेती बटईने दिल्याचे अनेक शेतकर्यांनी सांगितले़ लहरी शेतीमुळे शेती व्यवसायाकडे पाठ केली जात आहे.
हजारावर शेतकर्यांनी मोडला बैल-बारदाना
By admin | Updated: May 15, 2014 00:01 IST