तुळजापूर : चैत्री पौर्णिमेचे औचित्य साधून कडाक्याच्या उन्हाची तमा न बाळगता भाविकांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेवून सेवा समर्पित केली.गुरूवारी पहाटे १ वाजेच्या सुमारास देवीचे चरणतीर्थ होवून भाविकांसाठी मंदिराचे दरवाजे संस्थानने खुले केले होते. सकाळी सहा वाजता भाविकांकडून अभिषेक करण्यास सुरूवात झाली. त्यानंतर ११ वाजता हे अभिषेक बंद करयात आले. दुपारी १२ वाजता देवीस वस्त्र, अलंकार चढविण्यात आले. अभिषेक व धर्मदर्शन रांग भाविकांच्या गर्दीने फुलून गेली होती. देवीच्या दर्शनानंतर बहुतांश भाविक श्री येडेश्वरीच्या दर्शनासाठी येरमाळ्याकडे रवाना होताना दिसून आले. दरम्यान, सायंकाळच्या पुजेनंतर मंदिर प्रांगणात छबिना मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. ‘आई राजा उदो..उदो’च्या जगराने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. मुख्य महंत तुकोजी बुवा यांनी पौर्णिमेचा जोगवा मागून सेवा केली. यावेळी मंदिर संस्थानचे पदाधिकारी, भाविक, पुजारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. २२ एपिल रोजी पहाटे १ वाजता चरण तीर्थ झाल्यानंतर मंदिर उघडले जाते. त्यानंतर भाविकांच्या दर्शनास प्रारंभ होतो. सकाळी सहा वाजता भाविकांकडून केल्या जाणाऱ्या दही, दुधाच्या अभिषेकाला सुरूवात होते. ११ वाजता अभिषेक पूजा संपल्यानंतर वस्त्र व अलंकार घालतात. त्यानंतर रात्री सात वाजता पुन:श्च भाविकांचे अभिषेक होतात. तर सायंकाळी ९ वाजता मंदिर परिसरात छबिना मिरवणूक काढली जाते. कडाक्याच्या उन्हातही गर्दीगुरूवारी सकाळपासूनच भाविकांची गर्दी पहावयास मिळाली. साधारणपणे दहा वाजेच्या सुमारास उन्हाची तीव्रता वाढली. या उन्हाची तमा न बाळगता भाविकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी व्यापाऱ्या थाटलेल्या दुकानांच्या छताचा आधार घेत मंदिर परिसरात प्रवेश मिळविताना दिसून आहे. (वार्ताहर)
हजारो भाविकांनी घेतले तुळजाभवानीचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2016 00:27 IST