लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : रिमझिम पावसाच्या साक्षीने शेकडो भाविकांनी जगन्नाथांचा रथ ओढला. ‘जय जगन्नाथ’ असा जयघोष करीत सायंकाळी सिडकोतून निघालेला रथ एन-७ येथे पोहोचला. भगवान जगन्नाथांचे दर्शन घेण्यासाठी रथयात्रा मार्गावर जागोजागी भाविक जमले होते. ओरिसामधील ओरिया समाजातर्फे दरवर्षी जगन्नाथांची रथयात्रा काढण्यात येते. पारंपरिक वाद्य वाजवीत सिडकोतील मंदिरातून भगवान जगन्नाथ, भगवान बलराम व भगवान सुभद्रा यांच्या मूर्ती सजविलेल्या रथात आणण्यात आल्या. या आनंदोत्सवात पावसानेही हजेरी लावली. यामुळे भाविकांचा उत्साह द्विगुणित झाला होता. रथाच्या दोन्ही बाजूने शेकडो भाविकांनी दोरखंड ओढत रथयात्रेला सुरुवात केली. ओरिसा येथील भजनी मंडळांनी ढोलक व विशेष असे गुंजर वाद्याने वातावरण मंगलमय केले होते. या भजनी मंडळांनी वाद्य वाजवत नृत्य करीत भगवंतांची आराधना केली. वाद्य वाजविणाऱ्यांमध्ये लक्ष्मीधर नायक, सुरेश कुमार, वरदान मोहंती, सुदर्शन महापात्र, शारदाकुमार नाईक, संतोष नाईक यांचा समावेश होता. बळीराम पाटील हायस्कूल, सिडको एन-८ मार्गे रथयात्रा सिडको एन-७ परिसरात पोहोचली. येथे २ जुलैपर्यंत भगवंतांचा मुक्काम राहणार आहे. या काळात दररोज भगवंतांची आरती करण्यात येणार आहे. ३ जुलै रोजी सायंकाळी पुन्हा रथयात्रेने भगवंतांना मंदिरात आणण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख कपिल डाकवा, आशिष मिश्रा, रवीन सांमल, शंकर राज, अनिल पात्र, राजेश भारुका, अनिल कुमार यांच्यासह शेकडो भाविक हजर होते.
पावसाच्या साक्षीने भाविकांनी रथ ओढला
By admin | Updated: June 26, 2017 00:52 IST