कुंभारपिंपळगाव : येथून जवळच असलेल्या राजाटाकळी (ता.घनसावंगी) येथील अंगणवाड्यांची दुरवस्था झाल्याने त्याकडे पाहायला कुणीही तयार नाही. यासंदर्भात लोकमतने ‘अंगणवाड्याची दैना, कोणी लक्ष देईना’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच शनिवारी बालविकास अधिकाऱ्यांनी या अंगणवाड्यांची पाहणी करून सोयी-सुविधा पुरविणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आता अंगणवाड्यांची दैना संपणार असल्याने पालकवर्गातून लोकमतच्या वृत्ताचे स्वागत करण्यात आले.राजाटाकळीत असलेल्या पाचही अंगणवाड्यातील दुरवस्था व बालकांना मिळणाऱ्या निकृष्ट पोषण आहारासह अंगणवाडी इमारतींचा मुद्दा मांडला होता. याबाबत शनिवारच्या अंकात वृत्त प्रकाशित होताच प्रशासन खडबडून जागे झाले. बालविकास अधिकारी सुनंदा झरे यांनी शनिवारी सकाळी १० वाजताच राजाटाकळी गाठले. गावातील पाचही अंगणवाड्यांना भेटी देवून पाहणी केली. या पाहणीत सत्यता समोर आली. अंगणवाडीच्या हजेरी रजिस्टरमध्ये ६० टक्के पेक्षा कमी बालकांची संख्या आढळून आली. अंगणवाडी क्रंमाक २ मध्ये एकही बालक उपस्थित नसल्याचे दिसून आले. पिण्याचे पाणी नसल्याचे तसेच औषधीचा पुरवठाही होत नसल्याचे निदर्शनास आले. सुमारे चार तास झरे यांनी अंगणवाड्याची पाहणी करून ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी सुपरवायझर सुनंदा जोशी, कमलाबाई झिरपे, मदतनीस पारूबाई आर्दड, गौळनबाई आर्दड, छायाबाई औलारे, संगिता कटाळे, रेखा गाडेकर यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. (वार्ताहर)अंगणवाड्यांचे बांधकाम होणारराजाटाकळी येथील अंगणवाड्यांची पाहणी केल्यानंतर बालविकास अधिकारी सुनंदा झरे म्हणाल्या की, अंगणवाड्यांचे बांधकाम करण्यासाठी जागेचा प्रश्न आहे. त्यामुळे ग्रामपंचायतला पत्र देवून जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. पोषण आहार वाटपाचे काम असलेल्या बचत गटाकडून ते काम काढून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खात्यावर असलेल्या रकमेची लकरच पूर्तता करण्यात येणार आहे. अंगणवाडी परिसरासह संपूर्ण गावातील स्वच्छतेसाठी ग्रामसेवकांना सूचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले. अंगणवाड्यातील बालकांची काळजी घेण्यात येणार आहे. त्यादृष्टीने येथे सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे लोकमतशी बोलताना त्या म्हणाल्या.
‘त्या’ अंगणवाड्यांची दैना संपणार
By admin | Updated: June 8, 2014 00:56 IST