लातूर : मिरजेहून कृष्णेचे पाणी घेऊन जलपरीने गुरुवारी तिसरी खेप पुर्ण केली़ लातूर रेल्वे स्थानकात ६ वाजता दहा वॅगन घेऊन ही जलपरी पोहचली़ त्यानंतर रेल्वेस्थानकालगत असलेल्या विहीरीत पाणी उतरविण्यास प्रारंभ झाला असून,विहीरीतून टँकरद्वारे आर्वी येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी टाकले जात आहे़ तिसऱ्या खेपेलाही पाच लाख लिटर्स पाणी आणण्यात आले़लातूर शहरासाठी भंडारवाडी, माळकोंडजी, डोंगरगाव येथून ४० ते ५० लाख लिटर पाणी उपलब्ध केले जाते़ त्यामध्ये गुरुवारी पुन्हा रेल्वेने आलेल्या ५ लाख लिटर्स पाण्याची भर पडली आहे़ सदरील जलपरीने आलेले पाणी रेल्वे स्थानकाशेजारील एस़आऱदेशमुख यांच्या विहीरीत साठविण्यात येत असून तेथून ते पाणी आर्वी येथील जलशुद्धीकरण केंद्रात शुद्धीकरणासाठी नेले जात आहे़ जलशुद्धीकरणानंतर शहरातील विविध भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे़ गेल्या दोन दिवसांपासून जलपरीच्या फेऱ्या सुरु आहेत़ गुरुवारी सायंकाळी ६ वाजता जलपरीची तिसरी खेप आली असून रेल्वेस्थानकाशेजारील विहीरीत दहा वाघिनीतून सुमारे पाच लाख लिटर पाण्याची साठवणूक केली जात आहे़ या जलपरीचे आगमन होताच खा़सुनिल गाकवाड, उपविभागीय अधिकारी प्रताप काळे, मनपा उपायुक्त संभाजी वाघमारे, तहसीलदार संजय वारकड आदींनी जलपरीचे स्वागत केले़ जलपरितून पाणी उतरविण्याचा तिसरा टप्पा असल्याने कमी कालावधीत पाणी विहीरीत सोडण्यात आले असल्याचे रेल्वे स्थानकातील अधिकारी काळे यांनी सांगितले़
जलपरीची तिसरी खेप
By admin | Updated: April 15, 2016 00:52 IST