निलंगा : निलंगा शहरातील छत्रपती शिवाजी चौकातील भाजी विक्रेत्यांनी केलेले अतिक्रमण सलग तिसर्यांदा काढून पालिकेतर्फे बांधण्यात आलेल्या भाजी मार्केटमध्ये विनाशुल्क भाजी विक्रेत्यांना दुकाने देण्यात येणार असल्याचे नगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले. छत्रपती शिवाजी चौकात लातूर-बीदर राज्यमार्गावर दूध डेअरी कम्पाऊंडलगत सुमारे शंभर-सव्वाशे भाजीविक्रेते व्यवसायासाठी बसतात. मात्र या परिसरात अतिक्रमण एवढ्या मोठ्या प्रमाणात झाले असून, या अतिक्रमणामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा होत आहे. परिणामी, नगरपालिकेच्या वतीने वारंवार नोटिसा देऊनही व दोनवेळा अतिक्रमण काढूनही भाजी विक्रेत्यांनी त्याच ठिकाणी ठाण मांडले आहे. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी सलग तिसर्यांदा सोमवारपासून भाजी विक्रेत्यांच्या अतिक्रमण कार्यक्षेत्रात नगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. भाजीपाला विक्रेत्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शहरातील आनंदमुनी चौकात ४५ लाख रुपये खर्च करून भव्य दिव्य असे भाजी मार्केट उभे केले आहे. यामुळे भाजी विक्रेत्यांचा व्यवसाय सुरळीत होईपर्यंत नगरपालिकेच्या वतीने मोफत दुकाने देण्यात येणार आहेत, असे आश्वासन मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी दिले असूनही भाजी विक्रेते नवीन भाजी मार्केटमध्ये बसतच नाहीत. अतिक्रमण उठविल्यानंतर अन्य ठिकाणी भाजी विक्रीसाठी बसतात. त्यामुळे रहदारीस अडथळा होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे सलग दोनवेळा अतिक्रमण काढूनही भाजीपाला विक्रेत्यांवर काहीही परिणाम होत नाही. त्यामुळे तिसर्यांदा अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली असल्याचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी सांगितले. अतिक्रमण हटाव मोहिमेचे काम सोमवारी सुरू करण्यात आले असून, यामध्ये नगरपालिकेचे अधिकारी, २६ कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे २ कर्मचारी, पोलिस निरीक्षक औदुंबर खेडेकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक सूरज चंदनशिवे, चार पोलिस कर्मचारी यांचा समावेश आहे. याबाबत विरोधी पक्षाच्या नगरसेविका वसुंधरा शिंगाडे यांनी शहराचा विस्तार छत्रपती शिवाजी चौकाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झाला. जुन्या शहरात केवळ २५ टक्के वस्ती आहे. नवीन विस्तारित ठिकाणी ७५ टक्के लोक राहतात. त्यामुळे छत्रपती शिवाजी चौकातच नवीन भाजी मार्केटही केले असते तर नगरपालिकेचा खर्च वाचला असता. पैशाचा विनियोग व्यवस्थित झाला असता, असे मतही त्यांनी व्यक्त केले. (वार्ताहर) नवीन भाजी मार्केट गैरसोयीचे..! नवीन भाजी मार्केट मध्यवर्ती भाजी मार्केटपासून सहा किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे शहरातील आनंदनगर, विश्वकर्मा पांचाळ कॉलनी, बँक कॉलनी, हाडगा नाका, सरस्वतीनगर या भागांतील नागरिकांना भाजीपाला खरेदीसाठी जाण्यासाठी अडचणीचे व लांब आहे. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी जुन्या मार्केटमध्येच भाजी मार्केटची सोय कायम रहावी, अशी मागणी भाजी मार्केटमधील विक्रेत्यांनी केली आहे. अन्यथा पालिकेची हुकुमशाही पद्धतीने सुरू असलेली अतिक्रमण हटाव मोहीम मोडीत काढू, असा इशारा भाजी विक्रेत्यांनी दिला.
सलग तिसर्यांदा अतिक्रमण काढले
By admin | Updated: May 27, 2014 00:56 IST