वाळूज महानगर : वाळूज येथील जागेचा ग्रामपंचायत व वाळूज पोलीस ठाण्यातील वाद मिटत नसल्यामुळे जलकुंभाचे काम रखडले आहे. आता तिसऱ्यांदा शुक्रवारी (दि.४) जालना भूमिअभिलेख कार्यालयाकडून या जागेची मोजणी केली जाणार आहे.
वाळूजचा गंभीर बनलेला पाणीप्रश्न सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीने एमआयडीसीचा सतत पाठपुरावा करून दररोज १४ दशलक्ष पाणीपुरवठा मंजूर करून घेतला. मात्र, पाणी साठविण्यासाठी जलकुंभ अपुरा पडत असल्यामुळे ग्रामपंचायतीने जुना जलकुंभ पाडून नवीन जलकुंभ उभारण्याचा निर्णय घेतला. दीड वर्षांपूर्वी शासकीय गट क्रमांक ३४० मध्ये नवीन जलकुंभ उभारण्याचे काम हाती घेतले. मात्र, ते काम पोलीस वसाहतीच्या हद्दीत येत असल्याचा दावा करीत पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी थांबविले होते. जागेचा वाद निर्माण झाल्यानंतर गंगापूर भूमिअभिलेख कार्यालयाकडून या जागेची मोजणी करण्यात आली. या मोजणीत जलकुंभ पोलीस वसाहतीच्या हद्दीत येत असल्याचे दर्शविण्यात आले. मात्र, मोजणी अहवालात खाडाखोड झाल्याचा आरोप करीत ग्रामपंचायतीने यासंदर्भात तत्कालीन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे दाद मागितली होती. जिल्हाधिकारी चौधरी यांच्या आदेशावरुन या जागेची औरंगाबाद भूमिअभिलेख कार्यालयाकडून दुसऱ्यांना मोजणी करण्यात आली. यात पोलीस वसाहतीच्या हद्दीत जलकुंभ येत नसल्याचा अहवाल देण्यात आला. दोन कार्यालयांत जलकुंभाच्या जागेवरुन वेगवेगळे अहवाल देण्यात आल्यामुळे ही जागा नेमकी कुणाची, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
तिसऱ्यांदा होणार जागेची मागणी
या जागेची शुक्रवारी (दि.४) जालना भूमिअभिलेख कार्यालयाकडून तिसऱ्यांदा मोजणी करण्याचा निर्णय भूमिअभिलेख उपसंचालकांनी घेतला आहे. जालना भूमिअभिलेखचे पथक शुक्रवारी वाळूजला येणार आहे. जलकुंभाच्या जागेचा वाद समोपचाराने मिटविण्याऐवजी ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने हा मुद्दा प्रतिष्ठेचा बनविल्यामुळे गावातील नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.
------------------------