कचनेर, बिडकीन : पैठण तालुक्यातील गाझीपूर पाडळी येथे २९ एप्रिल रोजी शेतीच्या वादातून जखमी झालेल्या इसमाचा रविवारी रात्री उपचार सुरू असताना मृत्यू झाला. आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी नातेवाईकांनी दोन तास मृतदेह बिडकीन ठाण्यात ठेवल्याची घटना रविवारी घडली. अखेर पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. बुधवार दि.२९ एप्रिल रोजी संगीता रायभान गायकवाड यांच्या घरात घुसून शेतीच्या वादामुळे यांचा मुलगा सचिन रायभान गायकवाड (२८) यांना रमेश नाना गायकवाड, रतन नाना गायकवाड, उत्तम नाना गायकवाड, नाना सखाराम गायकवाड (रा. पाडळी) यांनी शिवीगाळ करत मारहाण केली होती. याप्रकरणी ३० एप्रिल रोजी संगीता रायभान गायकवाड यांनी बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. जखमी सचिन ऊर्फ पिनू गायकवाड याचा रविवार दि. १० मे रोजी रात्री घाटी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटना होऊन तब्बल बारा दिवस उलटले तरी आरोपींना अटक का केली नाही, असा प्रश्न उपस्थित करत लवकरात लवकर आरोपींना अटक करण्यात यावी या मागणीसाठी संतप्त नातेवाईकांनी बिडकीन पोलीस ठाण्यात दोन तास मृतदेह ठेवला. नंतर पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. तसेच लेखी आश्वासनानंतर जमावाने माघार घेतली. खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले.
आरोपीच्या अटकेसाठी मृतदेह ठाण्यात
By admin | Updated: May 12, 2015 00:55 IST