जालना : सध्या जिल्ह्याला चांगले दिवस आले आहेत म्हणूनच पक्षीय मतभेद बाजूला सारुन जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा तयार करुन प्रत्येकाने जबाबदारी वाटून घ्यावी, तरच विकासाची गंगा जिल्ह्यात सर्वदूर पोहोचेल. ही संधी दवडली तर पुन्हा हे दिवस येणार नाहीत, असे भावनिक आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शनिवारी जालन्यात केले.मा. फुलंब्रीकर नाट्यगृहात राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा सर्वपक्षीय सत्कार करण्यात आला. यावेळी खा. दानवे अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री बबनराव लोणीकर, आ. राजेश टोपे, आ. नारायण कुचे, आ.संतोष दानवे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, माजी आ. संतोष सांबरे, शिवसेना सहसंपर्क प्रमुख शिवाजी चोथे, नेते डॉ. हिकमतराव उढाण, रिपाइंचे मराठवाडा अध्यक्ष ब्रम्हानंद चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, लक्ष्मण वडले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेश राऊत, बबलू चौधरी, उद्योजक घनशाम गोयल, किशोर अग्रवाल, भाजप जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, संतोष गाजरे, ओमप्रकाश चितळकर, सुधाकर निकाळजे, रमेशचंद्र तवरावाला, सतीश तवरावाला, सतीश पंच, जि.प. उपाध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, एकबाल पाशा, शेख महेमूद, सगीर अहमद, भास्कर दानवे, डॉ.सुुभाष अजमेरा, अनुराग कपूर, पंडित धानुरे, विष्णू पाचफुले, जगन्नाथ काकडे, बाला परदेशी, हरिहर शिंदे, भाऊसाहेब पाऊलबुध्दे, बाबासाहेब इंगळे, किरण गरड, यांच्यासह विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. खा. दानवे म्हणाले की, आपल्या ३५ वर्षांच्या राजकीय प्रवासात कुठलीही अपेक्षा ठेवली नाही. मित्र आले आणि गेले. पण प्रवास मात्र सुरुच राहिला. दोन वेळा आमदार आणि चार वेळा खासदार याच जनतेने बनविले. पूर्वी सत्ता नसल्याने निर्णय घेऊ शकत नव्हतो. मात्र, आता देशात आणि राज्यात आपलेच सरकार आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्याचा शिक्षण, सिंचन, रस्ते आदींचा अनुशेष भरुन काढण्यासाठी एकत्र बसण्याचा निर्णय राबविलाच पाहिजे, असा आग्रह त्यांनी धरला. त्यासाठी पालकमंत्री लोणीकर आणि राज्यमंत्री खोतकर यांनी पुढाकार घेऊन प्रत्येक गावाचा, तालुक्याचा आणि जिल्ह्याचा विकासाचा कृती आराखडा तयार करावा. तसेच हा आराखडा जसाच्या तसा मुख्यमंत्र्यांकडून मंजूर करवून घेतला जाईल. केंद्रातून असो वा मुख्यमंत्र्यांकडून निधी आणू, अशी ग्वाही खा. दानवे यांनी दिली. नेता हा सर्वमान्य असला पाहिजे. त्याचे सर्वांशी चांगले संबंध असले पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे हे आ. राजेश टोपे यांच्या घरी भेट देतात. मात्र, शरद पवार यांनी एकदा माझ्याघरी भेट दिली तर रात्रभर मला काही झोपू दिले नाही, अशी कोटी खा. दानवे यांनी केली. यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. जालन्यात कुठलाही कार्यक्रम झाला तरी आतापर्यंत आपण प्रमुख पाहुणे म्हणूनच होतो. मात्र पहिल्यांदाच या कार्यक्रमातून अध्यक्षपदाचा आपल्याला मान मिळाला.सत्काराला उत्तर देताना राज्यमंत्री खोतकर म्हणाले की, आजच्या या सत्कारामुळे कर्तव्याची जाणीव झाली आहे. बुद्धी आणि शक्तीचा योग्य वापर करुन सामान्य माणसाच्या हितासाठी काम करणार आहोत. माझ्या बाजूने कोण उभा राहिला, याचा कधी पेन व वही घेऊन हिशेब केला नाही. आमदारकी असो मंत्रीपद हे केवळ सामान्य माणसाठीच घेतले. तसे नसते तर विधानसभेत शेतकऱ्यांचे प्रश्न, सिंचन व जिल्ह्यातील विजेचा प्रश्न पोटतिडकीने मांडला नसता. सामान्यांसाठी लढल्याने आपण येथपर्यंत पोहोचलो आहोत. जालना-वडीगोद्री रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करु. उतणार नाही मातणार नाही, घेतला वसा सोडणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी उपस्थितांना दिली. जालना जिल्हा हे तिसरे सत्ता केंद्र झाल्याचे सांगत आ.टोपे यांनी अंबड-जालना महामार्गाचे काम लवकरात लवकर करावे, अशी मागणी करतानाच खोतकर यांना मंत्रीपद मिळण्यात अजित पवारांचाही खारीचा वाटा असल्याचे सांगितले. सभागृहात अजित पवारांनी शिवसेनेचा मराठवाड्यात एकही मंत्री नसल्याने खोतकरांकडे अंगुलीनिर्देश करत त्यांना मंत्रीपद मिळाल्यास मराठवाड्यावरील अन्याय दूर होईल, असे सांगत खोतकरांना मंत्रिपद मिळण्यासाठी रेटा केल्याचे आ. टोपे म्हणाले.माजी आ.जेथलिया म्हणाले की, भाजपा प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांचे केंद्रात वजन वाढले आहे, तर जिल्ह्यात दोन मंत्री झाल्याने राज्यातही जिल्ह्याला महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे आगामी काळात केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना आणून जिल्ह्याचा अनुशेष भरुन काढला जाणार, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.यावेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर, शिवाजी चोथे, अॅड. ब्रम्हानंद चव्हाण यांचीही भाषणे झाली. या सोहळ्यास जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता. (प्रतिनिधी)३५ वर्षे राजकारणात सक्रिय असून, चार वेळा खासदार आणि दोन वेळ आमदार राहिलो आहे. मिसरुडही फुटले नव्हते तेव्हा सभापती झालो. व्यासपीठावरील नेते पाहता आज राजकारणात मी सर्वांचा आजोबा आहे, असे सांगत खा. रावसाहेब दानवे यांनी जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा बदलण्याचे सामर्थ्य आपल्यात असल्याचे संकेत दिले.जिल्ह्याला दोन मंत्रीपदे मिळाली आहेत. त्यामुळे साहजिकच जिल्ह्याच्या विकासाबाबत सर्वांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. जिल्ह्यातील रस्ते, सिंचन यासोबतच जालना शहरातील पथदिवे पाचवर्षांपासून बंद आहेत. हे प्रश्न सोडविण्यात यावेत, अशी सामान्यांची अपेक्षा आहे. ती लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी प्रास्ताविकात व्यक्त केला.
हे दिवस पुन्हा येणार नाहीत..!
By admin | Updated: July 24, 2016 00:42 IST