औरंगाबाद : औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून शनिवारी २१ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ऐनवेळी रिपब्लिकन सेनेच्या मिलिंद दाभाडे यांना येथून उमेदवारी देण्यात आली. भाजपाचे उमेदवार मधुकर सावंत आणि मनसेच्या वतीने गौतम आमराव यांनीही उमेदवारी अर्ज सादर केले. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात पहिल्यापासून चुरस दिसून येत आहे. काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र देहाडे, शिवसेनेचे आ. संजय शिरसाट, पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार गंगाधर गाडे यांच्यासह १२ जणांनी कालपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आज शेवटचा दिवस असल्यामुळे सकाळपासून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी झाली होती. भाजपाने मधुकर सावंत यांना कालच उमेदवारी जाहीर केली. सावंत यांनी याआधीच तीन उमेदवारी अर्ज दाखल केले. आज त्यांनी पक्षाचा बी फॉर्म सादर केला. त्यानंतर मनसेचे उमेदवार गौतम आमराव यांनी आपली उमेदवारी दाखल केली. काल रात्रीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निश्चित न झाल्यामुळे याविषयी उत्सुकता होती. आज अचानक रिपब्लिकन सेनेचे मिलिंद दाभाडे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यात आली. त्यांनी दुपारी येऊन अर्ज दाखल केला.
पश्चिम मतदारसंघात होणार बहुरंगी लढत
By admin | Updated: September 28, 2014 01:03 IST