उस्मानाबाद : जिल्ह्याचे लक्ष उस्मानाबाद पालिका निवडणुकीकडे लागले आहे. जिल्ह्यातील ‘अ’ वर्गातील या एकमेव पालिकेवर झेंड फडकविण्यासाठी प्रमुख चार पक्षासह इतरांनी जोर लावला आहे.शुक्रवारी राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे तर भाजपाकडून सहकारमंत्री सुभाष देशमुख विविध ठिकाणी सभा तसेच प्रचारफेऱ्या काढल्या. शनिवारी असुद्दीन ओवेसी यांची ‘एमआयएम’च्या प्रचारासाठी सभा होत असून काँग्रेसह भाजपाचेही दिग्गज नेते पुढील काळात प्रचारात उतरत असल्याने निवडणुकीची चुरस कमालीची वाढणार आहे.उस्मानाबाद नगर पालिकेत नगराध्यक्ष पदासाठी मोठी चुरस आहे. जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे पंधरा उमेदवार निवडणूक आखाड्यात असले तरी काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना, भाजप या चार प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराची प्रचाराची राळ उडवून दिली आहे. मागील काही दिवसांत प्रमुख उमेदवारांनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसह गृहभेटी आणि कॉर्नर बैठकांवर भर दिल्याचे दिसून आले. प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात मात्र, सर्वच प्रमुख पक्षांकडून जाहीर सभांवर भर दिला जात आहे. राष्ट्रवादीची प्रचार यंत्रणा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली राबविली जात असून माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांनीही प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांस नागरिकांच्या भेटी घेऊन नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल पाटोदेकर यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे. शिवसेनेला पहिले काही दिवस नाराजांची मनधरणी करण्यात घालावे लागले असले तरी आता नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मकरंद राजेनिंबाळकर यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते नियोजनबद्ध कामाला लागल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्हा प्रमुख सुधीर पाटील यांच्यासह माजी आमदार ओम राजेनिंबाळकर यांनीही सेना उमेदवारांच्या प्रचारार्थ शहर पिंजून काढल्याचे चित्र आहे. काँग्रेसने यंदाची निवडणूक अत्यंत गांभीर्याने घेतल्याचे त्यांच्या प्रचार यंत्रणेवरून दिसत आहे. शहरातील प्रमुख दर्शनी भागावर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मधुकर तावडे यांच्यासह सदस्यांच्या प्रचाराचे डिजीटल झळकत आहेत. काँग्रेसचे राज्यस्तरावरील दिग्गजही प्रचाराच्या या दुसऱ्या टप्प्यात जाहीर सभा घेणार असून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या सभेसाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, शहरातील काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी तावडे यांच्या प्रचारासाठी एकसंघपणे मैदानात उतरल्याचे चित्र आहे. भाजपा यंदा पालिकेत प्रथमच नव्या जोमाने उतरली आहे. नगरसेवक पदासाठी सर्व जागावर उमेदवार उभे करण्यात यश आल्याने उस्मानाबादेतील चुरस वाढली आहे. भाजपाच्या प्रचारार्थ प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या सभांचे नियोजन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेसाठीही जिल्हा पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. (प्रतिनिधी)
आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या
By admin | Updated: November 19, 2016 00:41 IST