औरंगाबाद : ‘काँग्रेसच्या राजवटीत भ्रष्टाचार बोकाळला होता. दलितांवरचे अन्याय-अत्याचारही वाढले होते. त्यांना मला सत्तेवरून खेचायचे होते. एक दिवस बाळासाहेब ठाकरे मला म्हणाले, रामदास तुमची भीमशक्ती आणि आमची शिवशक्ती एकत्रित येऊ या. तुमच्यामुळे ते काँग्रेसवाले सत्तेत येतात. तुमचा वापर करून घेतात आणि तुम्हाला काही देत नाहीत. आम्ही विचार केला. सर्वांशी चर्चा केली आणि भीमशक्ती- शिवशक्ती एकत्रित आली. होय, मी भाजपबरोबर आहे. नरेंद्र मोदीबरोबर आहे. तिकडे काँग्रेसवाल्यांनीही काही दिलं नव्हतं. इथंही काही मिळत नाही.... बघू या काही मिळतं का ते’ असे हताश उद्गार आज येथे रिपाइं (ए ) चे राष्ट्रीय अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी काढले. ते भारत भीमयात्रेनिमित्त आमखास मैदानावर आयोजित जाहीर सभेत बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रदेश रिपाइं (ए) चे कार्याध्यक्ष बाबूराव कदम हे होते. सायंकाळी या यात्रेचे औरंगाबादेत जोरदार स्वागत करण्यात आले. यानिमित्त शहरातून वाहन रॅली काढण्यात आली. बसल्या बसल्या परिस्थितीनुरूप तयार केलेल्या काव्यपंक्ती पेश करीत नेहमीप्रमाणे खा.आठवले यांनी आपले भाषण खुलविले. त्यांच्या शीघ्र कविता अनेकदा टिंगलीचा व चेष्टेचा विषय झालेला असतानाही आठवले यांनी या चारोळ्यांचाच सहारा घेत आपले म्हणणे थेट उपस्थितांना भिडविण्यात यश मिळविले. त्याबद्दल त्यांना शब्दाशब्दाला टाळ्यांचा प्रतिसादही मिळत गेला. ‘बघा, औरंगाबादेत कसा सुटला आहे थंड वारा,मी देत आहे बुलंद’ जयभीमचा नारा, भारत भीमयात्रेच्या माध्यमातून मी जागा करीत आहे भारत सारा आणि वाजविणार आहे दुश्मनांचे बारा’ अशा काव्यपंक्ती त्यांनी सादर करून सभेचा ताबा घेतला. ते म्हणाले, कोण म्हणतंय आम्ही बीजेपीसोबत आहोत. बीजेपी आमच्यासोबत आहे. या सभेत रामदास आठवले यांच्या पत्नी सीमाताई आठवले यांचेही भाषण झाले. या सभेस आठवले यांचा मुलगा जित आठवले यांच्या बाजूलाच बसलेला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान बदलण्याची हिंमत कुणाचीही नाही. संविधान आग आहे, हात लावाल तर जळून जाल’ असा स्पष्ट इशारा खा. रामदास आठवले यांनी यावेळी दिला. बाबूराव कदम, बी.एम. मामा चव्हाण, ब्रह्मानंद चव्हाण, शीलाताई गांगुर्डे, दौलत खरात, पप्पू कागदे, धम्मानंद मुंडे आदींची भाषणे झाली. रिपाइं एचे जिल्हाध्यक्षद्वय अरविंद अवसरमल व संजय ठोकळ यांनी प्रास्ताविक केले. मिलिंद शेळके यांनी सूत्रसंचालन केले. प्रारंभी, प्रतापसिंग बोदडे व नागसेन सावदेकर आदींनी एकापेक्षा एक सरस भीमगीते गायली. राजाभाऊ शिरसाट यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. श्रावण गायकवाड, बाळकृष्ण इंगळे, नागराज गायकवाड, कुसुमताई खरात, पद्मावती शेळके, किशोर थोरात, विजय मगरे, सतीश गायकवाड, उमाकांत रणधीर, एस.एस. यादव, प्रशांत शेगावकर आदींनी या सभेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
इथंही काही मिळत नाही!
By admin | Updated: April 21, 2016 00:35 IST